मोठी बातमी! IAS पूजा खेडकर यांच्यावर दुसरी मोठी कारवाई; UPSC कडून गुन्हा दाखल
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये, याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राथमिक चौकशीनंतर आयोगाने खेडकर यांच्यावर ही कारवाई केली आहे.
UPSC registers case against Puja Dilip Kedkar, IAS, for alleged forgery and issues show cause notice for cancellation of her candidature. pic.twitter.com/QPEubTPeVB
— Press Trust of India (@PTI_News) July 19, 2024
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालय, कार्मिक मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, मसुरी येथील लाल बहाद्दूर शास्त्री अकादमी अशा सर्वांनी अहवाल मागविला होता. यापूर्वी राज्य शासनाने सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने परत बोलावून घेतले आहे. राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे. आता आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजु झालेल्या पूजा खेडकर यांना युपीएससी परिक्षेत 821 वी रँक मिळाली होती. त्यानंतरही त्यांना आयएएस केडर मिळाले. यासाठी त्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला जात आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांनी दृष्टीहीन असून दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. यासोबतच त्यांची निवड ओबीसी प्रवर्गातून झाली होती. यासाठी वडिलांचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा अधिक असूनही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पूजा खेडकर यांनी अपंग प्रमाणपत्रासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रयत्न केले. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग असल्याच्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भालगावचा पत्ता सादर केला होता. तर दुसरीकडे पुण्यातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंग प्रमाणपत्रासाठी पिंपरी चिंचवडचा पत्ता दिला होता. पिंपरी चिंचवड परिसरातील त्यांच्या पत्त्यावर आई मनोरमा खेडकर यांची कंपनीस्थित आहे. ही कंपनीदेखील अनधिकृत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर केंद्र सरकारकडून पूजा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक चौकशीनंतर पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करणयाचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अपंग प्रमाणपत्र ते 821 वी रँक मिळूनही IAS पदावर नियुक्ती इथंपर्यंतच्या प्रवासात ज्या अधिकाऱ्यांनी त्यांची मदत केली असेल त्यांचीही चौकशी करण्यात येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.