12 जिल्हे, 125 पंचायत समित्या आणि एकचं प्रश्न, सत्ता कोणाची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Untitled Design 6

Untitled Design 6

Who owns the power, the reputation of eminent leaders is at stake : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होणार आहे. या निवडणुकांमध्ये राज्यात सरासरी 70 टक्के मतदानाची नोंद झाली असून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली होती, त्याचे सावट या निवडणूक प्रक्रियेवरही स्पष्टपणे दिसून आले.

रायगड

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि भाजप जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, मंत्री योगेश कदम आणि आमदार शेखर निकम यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना एकत्र लढत असले तरी आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मंत्री नितेश राणे यांनी निकालाआधीच 25 जागा बिनविरोध करत आपला करिष्मा दाखवला आहे. तर दुसरीकडे उबाठा गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली आहे.

पुणे

पुणे जिल्ह्यात निवडणूक पूर्णपणे घराणेशाही आणि पक्षांतर्गत संघर्षाने तापलेली दिसून आली. भोरमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे भाजपकडून, तर राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे समोरासमोर आहेत. शिरवळमध्ये माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार रिंगणात आहेत. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत बंडखोरी दिसून आली असून कविता पवार यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. आंबेगावात ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसमोर अडचणी वाढल्या आहेत. दौंड, खेड आणि इंदापूरमध्येही दिग्गज नेत्यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सातारा

साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

सांगली

सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, काँग्रेसचे विश्वजीत कदम, भाजपचे गोपिचंद पडळकर, सत्यजित देशमुख, शिवसेनेचे सुहास बाबर, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह आजी-माजी आमदार आणि खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सोलापूर

सोलापुरात अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, दक्षिण आणि उत्तर सोलापूरमध्ये भाजप, शिंदे गट, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळाला.

आमदारकीची टर्म संपत आल्याने अजितदादांविषयी तडफड; हाकेंची मिटकरींवर टीका

कोल्हापूर

‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सतेज पाटील, चंद्रकांत पाटील, संजय मंडलिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीतच अंतर्गत रस्सीखेच झाल्याने निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

छत्रपती संभाजीनगर

सिल्लोड, पैठण, कन्नड, हातनूर, गणोरी, बिडकीन आणि ढोरकिन गटांमध्ये राजकीय घराण्यांतील थेट लढती पाहायला मिळाल्या असून भाजप, शिंदे गट, ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार संघर्ष झाला आहे.

परभणी

परभणीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील आणि माजी मंत्री सुरेश वरपूडरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री तानाजी सावंत, शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचीच नव्हे, तर अस्तित्वाची लढाई ठरली आहे.

लातूर

लातूरमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी खासदार सुधाकर शृंगारे आणि उबाठा गटाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अनेक ठिकाणी थेट पारिवारिक राजकारण रंगले आहे.

एकूणच, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नसून, त्या राज्यातील राजकीय शक्तिसमीकरण ठरवणाऱ्या निवडणुका ठरल्या आहेत. आजच्या मतमोजणीत नेमकं कोण बाजी मारणार, आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

Exit mobile version