धाराशिव : महायुतीने राज्यभरात घवघवीत यश मिळविल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यातच मुख्यमंत्री आणि मंत्रिपदावर कोणा-कोणाची वर्णी लागणार, कोणत्या जिल्ह्यांना किती मंत्रिपदे मिळणार, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाकडे जाणार याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. धाराशिवमध्येही (Dharashiv) जिल्ह्याच्या पदरात किती मंत्रिपदे येणार आणि पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Will Ranajagjitsinh Patil be appointed as the Guardian Minister of Dharashiv district)
जिल्ह्यातून भाजपचे (BJP)) एकमेव आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil ), यापूर्वी पालकमंत्री असलेले प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची प्रबळ दावेदारी आहे. त्यांच्यासोबत आता सलग चार वेळा शिक्षक आमदार असलेले विक्रम काळेही शर्यतीत असणार आहेत. सध्या तिघांनाही पक्षश्रेष्ठींनी मुंबईला बोलावले आहे. मात्र यातही राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. तसे होर्डिंग्ज देखील तुळजापूरमध्ये लावण्यात आले आहेत.
परंडा मतदारसंघातूनतानाजी सावंत यांचा निसटता विजय झाला आहे. राज्यस्तरीय नेते म्हणून त्यांची प्रतिमा असतानाही ते धाराशिव जिल्ह्यात विशेष करिश्मा दाखवू शकले नाहीत. दुसरीकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुरातून विविध प्रकारच्या प्रतिकूल परिस्थिती असतानाही एकहाती विजय मिळवला आहे. स्वच्छ प्रतिमा, विकासाची दूरदृष्टी असलेला नेता अशी त्यांनी आपली ओळख तयार केली आहे. संयमी व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांना चांगला फायदा झाला.
गतवेळी राणा जगजितसिंह पाटील यांचा 26 हजार मतांनी विजय झाला होता. यावेळी त्यांनी त्यांनी 50.82 टक्के मतदान घेत 36 हजारांपेक्षा अधिकच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. तसेच ते भाजपचे जिल्ह्यातील सलग दुसऱ्या वेळचे एकमेव आमदार आहेत. 2019 पूर्वी अगोदर भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात नव्हता. या वैशिष्ट्यामुळे आमदार राणा पाटीलही मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार बनले आहेत.
दरम्यान, तानाजी सावंत शिवसेनेचे एकमेव आमदार जिल्ह्यात असतानाही धाराशिवच्या पालकमंत्रीपदी राणाजगजितसिंह पाटील यांची वर्णी लावा अशी मागणी शिवसेनेतून झाली आहे. शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनीच ही मागणी केली आहे. अयोध्या, वाराणसी या तिर्थक्षेत्राच्या धर्तीवर तुळजापूरच्या विकासासासाठी राणा पाटील यांना पालकमंत्री करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
राणा जगजितसिंह पाटील यांना पालकमंत्री करा; धाराशिवच्या शिवसेना जिल्हाध्यक्षांचीच मागणी
.
#RanaJagjitSinh #पालकमंत्री #Bjp #Dharashiv #VidhanSabha #Shivsena pic.twitter.com/IN0vhiQmBh— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 25, 2024
राणा जगजितसिंह पाटील यांची धाराशिवच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे होर्डिंग्ज तुळजापूरमध्ये लावण्यात आलेले आहेत.
‘लवकरच पालकमंत्री’
जिल्ह्याचे भाग्यविधाते,होणारे पालकमंञी आदरणीय राणा दादा यांची तुळजापूर मतदार संघातुन मोठ्या मताधिक्यांने विधानसभेवर निवड झाल्या बद्दल , आभिनंदन!
जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी व जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व अबाधित रहावे यासाठी आदरणीय दादा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत ही तमाम जिल्हावासियांच्या वतीने श्री तुळजाभवानी मातेला प्रार्थना…
अशा आशयाचा मजकूर या होर्डिंग्जवर लिहिण्यात आला आहे. आता जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाकडे जाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.