Worker attempts to hang himself in Sugar Marketing Department office : अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून थकीत वेतनासाठी सरकारी कार्यालयांच्या उंबरठ्यावर चकरा मारणाऱ्या एका साखर कारखाना कामगाराने अखेर टोकाचे पाऊल उचलत थेट अधिकाऱ्यांच्या दालनात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे साखर कारखान्यांतील थकीत वेतनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आखिल सुभान शेख असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. ते नगर तालुका साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते. मात्र, कारखाना बंद पडल्यामुळे त्यांचे तब्बल 3 लाख 80 हजार रुपये वेतन आणि इतर देणी थकलेली आहेत. संबंधित कारखाना सध्या बंद अवस्थेत असून त्याचा कार्यभार साखर पणन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आवशयक म्हणून देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून आखिल शेख हे आपल्या थकीत पैशांसाठी साखर पणन विभागाच्या कार्यालयात वारंवार पाठपुरावा करत होते. मात्र, प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आर्थिक अडचणी, कुटुंबाची जबाबदारी आणि सततचे हेलपाटे यामुळे मानसिक तणाव वाढल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असलेले डी.के. शिवकुमार महाराष्ट्र काँग्रेससाठी तारणहार कसे ठरले?
आज सकाळी अखिल शेख हे थेट साखर पणन विभागाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्या हातात कीटकनाशक औषधाची बाटली आणि पेट्रोल होते. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन टेबलावर चढत फाशी घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. कर्मचारी आणि अधिकारी घाबरून बाहेर पळाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मात्र, या संपूर्ण प्रकाराची माहिती तात्काळ डायल 112 वर देण्यात आली. तोफखाना पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मोठा अनर्थ टाळला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत अखिल शेख यांना ताब्यात घेतले आणि त्यांची समजूत काढली. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.या घटनेनंतर साखर पणन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका कामगाराला स्वतःचा जीव देण्याचा निर्णय घ्यावा लागतो, यावरून प्रशासन किती संवेदनशील आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. थकीत वेतनासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक कामगारांची अवस्था याहून वेगळी नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित कामगारांचे थकीत पैसे तातडीने देण्यात यावेत, अशी मागणी विविध कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
