सत्कारात नाव पुकारलं नाही अन् तलाठ्याचा संताप अनावर; लोखंडी माईक डोक्यात घालून तरुणाला रक्तबंबाळ

Ahilyanagar : याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Written By: Published:
Jamkhed

अहिल्यानगर: स्वागतावेळी आपले नाव माईकवरून पुकारले नाही, या क्षुल्लक कारणावरून एका तलाठ्याने संतापाच्या भरात माईक हातातून हिसकावून तोच लोखंडी माईक एका तरुणाच्या डोक्यात घातला आहे.अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे ही घटना घडली. आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाहसोहळ्याला एका धक्कादायक घटनेने गालबोट लागले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळा (ता. जामखेड) येथील अशोक रामचंद्र पठाडे (वय 37) हे राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात सूत्रसंचालन करत होते. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक आणि मान्यवरांचे ते माईकवरून स्वागत करत असताना तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांनी त्यांच्याकडे येत माझं नाव माईकवर का पुकारलं नाही? असा जाब विचारला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. संतापलेल्या हजारे यांनी पठाडे यांना शिवीगाळ करत तोंडावर मारहाण केली. त्यानंतर हातातील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून तो त्यांच्या डोक्यात जोरात मारला आहे. या हल्ल्यात पठाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता तुला खल्लास करतो, अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेनंतर विवाहसोहळ्यात एकच गोंधळ उडाला. उपस्थित जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार आणि प्रशांत भाऊसाहेब पवार यांनी तत्काळ धाव घेत भांडण सोडवले आणि जखमी पठाडे यांची सुटका केली. त्यानंतर प्रशांत मारुती शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे दाखल केले.या प्रकरणी जखमी अशोक रामचंद्र पठाडे यांच्या फिर्यादीवरून तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे पुढील तपास करत आहेत.

follow us