लग्नासाठी काहीही! पुण्यात तरुणाचे अपहरण करून बीडला नेले, तरुणींसह 7 जणांना अटक

भरदिवसा आणि गजबजलेल्या रस्त्यावरून एका तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची थरारक घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद परिसरात घडली.

Untitled Design 1 3

Untitled Design 1 3

Young woman kidnaps young man for marriage : पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला हादरा देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या रस्त्यावरून एका तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची थरारक घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद परिसरात घडली. विशेष म्हणजे, हे अपहरण खंडणीसाठी किंवा जुन्या वैरातून नव्हे, तर जबरदस्तीने लग्न करण्यासाठी करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार असलेल्या 27 वर्षीय तरुणीसह सात आरोपींना अटक केली असून, अपहृत तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश लक्ष्मण बोद्रे (वय 29 , रा. शिंदेवाडी, ता. हवेली) हे 27 मे रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. त्याचवेळी काही आरोपी मोटारीतून तेथे आले. त्यांनी नीलेश यांना जबर मारहाण केली आणि परिसरातील लोक काही समजून घेण्याच्या आतच त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेले. हा संपूर्ण प्रकार इतक्या वेगाने घडला की, प्रत्यक्षदर्शींनाही काही क्षण काय घडत आहे हे समजू शकले नाही.

घटनेनंतर नीलेश यांचा संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांचा भाऊ अजय लक्ष्मण बोद्रे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. लोणीकंद पोलिस आणि पुणे गुन्हे शाखेची पाच विशेष पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि वाहनांच्या हालचालींचा तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी बीडकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बीड पोलिसांच्या मदतीने माजलगाव येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत अपहरण झालेल्या नीलेश बोद्रे यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्याचवेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तरुणीसह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मान्सून वेळेवर नाही, एल निनोचा प्रभाव वाढतोय; शेतकऱ्यांसमोर नव्या चिंतेचे ढग

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुदाम माणिक ताठे, शेख सोहेल शेख अफसर, देविदास भगवान पांजगे, वैभव मिलिंद शेळके, प्रसाद बंडू गवळी, मोटार चालक सारंग भगवानराव काकडे आणि एका 27 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. आरोपींपैकी काही जण परभणी जिल्ह्यातील तर एक आरोपी नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात संबंधित तरुणीला नीलेश यांच्याशी लग्न करायचे होते. मात्र, काही कारणांमुळे हे लग्न होत नसल्याने तिने साथीदारांच्या मदतीने थेट अपहरणाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. अपहरणानंतर नीलेश यांच्यावर लग्नासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचाही संशय पोलिस व्यक्त करत आहेत. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या कटामागे आणखी कोणी आहे का, तसेच या प्रकरणाचे इतर धागेदोरे आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, भररस्त्यात लोकांसमोर अशा प्रकारे तरुणाचे अपहरण झाल्याने पुणे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version