मान्सून वेळेवर नाही, एल निनोचा प्रभाव वाढतोय; शेतकऱ्यांसमोर नव्या चिंतेचे ढग

हवामान विभागाने 15 मे रोजी केलेला अंदाज चुकीचा ठरत असून, केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले होते.

  • Written By: Published:
Untitled Design 113

Monsoon is not on time : देशभरातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आणखी लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने 15 मे रोजी केलेला अंदाज चुकीचा ठरत असून, केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले होते. अंदाजात चार दिवसांचा फरक संभवत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मान्सून गेल्या पाच दिवसांपासून केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावरच थांबला आहे.

खासगी हवामान संस्था स्कायमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांच्या मते, मान्सून आता किमान 3 ते 4 जूनदरम्यान केरळमध्ये पोहोचू शकतो. मात्र, मुसळधार पावसासह दमदार एंट्रीची शक्यता सध्या दिसत नाही. पुढील काही दिवस देशातील इतर भागांतही मान्सूनची प्रगती अत्यंत संथ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मान्सूनने 16 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण न झाल्यामुळे त्याची पुढील वाटचाल मंदावली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असून अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक 46.8 अंश सेल्सियस तापमान वर्धा येथे नोंदवले गेले. नागपूरमध्ये 46.4, गोंदियात 46.1, चंद्रपूरमध्ये 45.4 आणि अमरावतीत 45.2 अंश तापमानाची नोंद झाली. जळगाव आणि परभणी येथे 42.4, बीडमध्ये 41.8, संभाजीनगरमध्ये 41.4, सोलापुरात 41.2 आणि पुण्यात 38.4 अंश तापमान राहिले. उष्णतेच्या या झळांमध्ये अमरावतीत मात्र पावसाच्या सरी बरसल्या.

पुणे-अहिल्यानगर प्रवासात 45 मिनिटे वाचणार; देशातील सर्वात लांब उन्नत मार्गाचा विकास…

याचवेळी हवामान तज्ज्ञांचे लक्ष प्रशांत महासागरातील वेगाने वाढणाऱ्या तापमानाकडे लागले आहे. गेल्या सहा महिन्यांत मध्य प्रशांत महासागराचे सरासरी तापमान 1 अंश सेल्सियसपेक्षा अधिक वाढले असून, हा गेल्या शंभर वर्षांतील सर्वात वेगवान वॉर्मिंग ट्रेंड मानला जात आहे. त्यामुळे महासागर वेगाने एल निनो फेजकडे सरकत असल्याचे संकेत मिळत आहेत. महत्त्वाचा मानला जाणारा निनो 3.4 इंडेक्स मे 2024 नंतर प्रथमच +0.5 अंशांपर्यंत पोहोचला आहे. ही मर्यादा ओलांडल्यानंतर हवामानशास्त्रात एन्सो न्यूट्रल स्थितीतून एल निनो स्थितीकडे संक्रमण मानले जाते.

इतिहास पाहिला तर 1950 नंतर आतापर्यंत केवळ सहा वेळा सुपर एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे. त्यापैकी दोन वेळा मान्सून सामान्य राहिला, तर काही वर्षांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. 1972 मध्ये सर्वात तीव्र सुपर एल निनो तयार झाला होता. त्या वेळी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 2.3 अंश सेल्सियसपर्यंत वाढले आणि देशात केवळ 76 टक्के पाऊस झाला होता.

तथापि, हवामान तज्ज्ञ जी. पी. शर्मा यांनी स्पष्ट केले की, मान्सून वेळेआधी किंवा उशिरा येणे आणि एल निनोची तीव्रता यांचा मान्सूनच्या एकूण पावसाशी थेट संबंध नसतो. त्यामुळे यंदाच्या मान्सूनबाबत अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

follow us