रेल्वे डब्यातील दुसरा प्रताप समोर; ‘सुहागरात कोच’नंतर आता ट्रेनच्या डब्यात पूजाअर्चा, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेचे कामकाज यांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले.

News Photo   2026 07 13T173551.919

रेल्वे डब्याची ‘सुहागरात कोच’ अशी चर्चा रंगल्यानंतर (Railway) आता ट्रेनमधील आणखी एका अनोख्या व्हिडिओने ऑनलाइन विश्वात चर्चांना उधाण आलं आहे. रेल्वेच्या डब्यात धार्मिक विधी पार पाडले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये एक भटजी डब्यात खाली बसून पूजा विधी करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत अनेक भाविकही पुजेत सहभागी झाले आहेत.

हे सगळे विधी धावत्या ट्रेनमध्ये पार पाडण्यात आले. त्यामुळे रेल्वेच्या डब्यांमध्ये अशा प्रकारे धार्मिक विधी करण्यास परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, उत्तर रेल्वेने स्पष्ट केले की हे धार्मिक विधी एका खाजगीरित्या आरक्षित केलेल्या ‘ सलून कार ‘मध्ये पार पडले. हा डबा IRCTC कडील व्यावसायिक बुकिंगद्वारे उपलब्ध करून देण्यात आला होता.

विश्वगुरू दाव्यावर ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची टीका; जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज

याबाबत विचारणा करणाऱ्या एका पोस्टला उत्तर देताना उत्तर रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’वर सांगितलं की, ही पूजा एका विशेष सॅलून कारमध्ये करण्यात आली होती. हा धार्मिक कार्यक्रम सामान्य प्रवासी डब्यात न होता, एका खाजगी ग्रुपने आयआरसीटीसीद्वारे बुक केलेल्या ‘सलून कार’मध्ये आयोजित करण्यात आला होता. रेल्वेमधील ‘सलून कार’ हा उच्चपदस्थ अधिकारी आणि व्हीआयपींसाठी तयार केलेला एक खाजगी व आलिशान डबा असतो. यात वातानुकूलित शयनकक्ष, स्वयंपाकघर, दिवाणखाना व भोजन कक्ष, तसंच संलग्न प्रसाधनगृहे यांसारख्या सुविधा असतात.

रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, हे बुकिंग ८ जुलै रोजी करण्यात आले होतं. संबंधित ग्रुपने या व्यावसायिक बुकिंगसाठी ३ लाख रुपयांहून अधिक ॲडव्हान्स रक्कम भरली होती. ही सलून कार १० जुलै रोजी नवी दिल्ली ते मुंबई मार्गावरील ‘पश्चिम एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १२९२६) ला जोडण्याचे नियोजित होते. आयआरसीटीसीद्वारे ८ जुलै २०२६ रोजी ‘सलून कार’ बुक करण्यात आली होती. त्यांनी व्यावसायिक बुकिंग म्हणून ३,०८,५८० रुपयांची आगाऊ रक्कम भरली होती. ही सलून कार १० जुलै २०२६ रोजी नवी दिल्ली ते मुंबई या सिंगल प्रवासासाठी ‘पश्चिम एक्सप्रेस’ला जोडली जाणार होती असं स्पष्टीकरण ‘नॉर्दर्न रेल्वे’च्या ‘एक्स’ खात्यावरून देण्यात आलं आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेचे कामकाज यांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, “गाड्या वेळेवर धावण्याची निश्चिती, तसेच प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांची काळजी घेणे ही रेल्वेची मुख्य भूमिका आणि जबाबदारी आहे आणि यात कोणतीही तडजोड केली जात नाही. या घटनेदरम्यान “कोणीही जखमी झाले नाही. अभिषेक करताना दिसलेले भटजी हे खाजगीरित्या आरक्षित केलेल्या सलून कारमध्ये सुरु असलेल्या धार्मिक विधीचाच एक भाग होते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

follow us