Sunetra Pawar May Be New Deputy CM Of Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंत आता उपमुख्यमंत्री कोण? या चर्चांना सुरूवात झाली असून, अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. याबाबत छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांनी पुढील दिशा ठरवण्यासाठी सुनेत्रा पवार यांची भेटही घेतल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे अंत्यविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवळ यांनीदेखील सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीतील हालचाली आणि झिरवळ यांच्या मागणीनंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणि हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
Video : अजित पवारांच्या जाण्याने अनेक समीकरणं बदलणार! पक्षाचं नेतृत्व कुणाकडं जाणार?, खास स्टोरी
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री होते. त्याचबरोबर ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. अंत्यविधीच्या वेळी पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही उपस्थित मान्यवरांच्या भेटीगाठी घेताना दिसत होते. संपूर्ण विधीस्थळी हे दोघेच पुढे उभे होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते आणि पवार कुटुंबातील सदस्य खाली बसलेले होते. या दृश्यामुळे पार्थ आणि जय पवार हेच अजित पवार यांचे राजकीय वारसदार असू शकतात, अशी चर्चा रंगली होती. अशातच नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याने या चर्चेला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
बापट कलमाडी आणि आता अजितदादा… तीन नेत्यांच्या निधनाने पुणे झालं पोरकं
महायुतीतील भाजप आणि शिंदे गट सावध पावले टाकत आहेत. अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली ‘वोट बँक’ टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा पर्याय महायुतीसाठी फायदाचा असू शकतो . दुसरीकडे, शरद पवार गटाकडूनही काही हालचाली होण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी “दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे दोन्ही गटांचे एकत्रीकरण” असा सूरही लावल्याचे पाहायला मिळत आहे.
वायएसआर ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले
पवार कुटुंबीय राजकारणात नेहमीच व्यावहारिक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे. परिस्थितीची गरज आणि भविष्यातील राजकीय समीकरणे ओळखून निर्णय घेण्यात हे कुटुंब वाकबगार मानले जाते. एकीकडे अजित पवार यांच्या निधनाचे तीव्र दुःख असताना, दुसरीकडे त्यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, उपमुख्यमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेतला जाणार आणि पवार कुटुंबाची पुढील राजकीय दिशा काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
