Download App

Video : नव्या धोरणांसाठी 100 दिवस, माझ्या शपथविधीनंतर RBI कर्मचाऱ्यांना भरपूर काम : मोदी

  • Written By: Last Updated:

मुंबई : आमची निती योग्य असल्याने निर्णय योग्य असल्याचे सांगत गेल्या 10 वर्षात बँकिंग सेक्टरची घोडदौड जोरात सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सांगितले. गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात आपण कमालीचे बदल पाहिले आहेत असेही मोदी म्हणाले. मोदी मुंबईत आयोजित आरबीआयच्या (RBI) कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींनी RBI च्या ध्येयांसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच हा फक्त ट्रेलर असून, आपल्याला अजून देशाला पुढे घेऊन जायचे आहे. यासाठी आपल्याला AI. मशिन लर्निंगची मदत घ्यावी लागेल असेही मोदींनी यावेळी सांगितले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि RBI गव्हर्नर शक्तीकांत दास देखील उपस्थित आहेत. यावेळी RBI ला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोदींच्या हस्ते विशेष नाणेदेखील लॉन्च करण्यात आले. (RBI 90 Year Completed Function PM Modi)

मोदी म्हणाले की, 2014 मध्ये जेव्हा मी आरबीआयला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. संपूर्ण बँकिंग क्षेत्र समस्या आणि आव्हानांशी झुंजत होता. परिस्थिती इतकी वाईट होती की, सार्वजनिक क्षेत्रातील बँका देशाच्या आर्थिक प्रगतीला पुरेशी चालना देऊ शकल्या नाहीत. मात्र, आज भारताच्या बँकिंग व्यवस्थेकडे जगातील एक मजबूत आणि टिकाऊ बँकिंग प्रणाली म्हणून पाहिले जात आहे. 

आरबीआयच्या 90 वर्षांच्या कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआयची भूमिका खूप महत्त्वाची आणि मोठी आहे. आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. मी आगामी 100 दिवस निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे तुमच्याकडे (नवीन धोरणे) विचार करण्यासाठी खूप वेळ आहे. कारण माझ्या शपथविधी समारंभानंतर दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे प्रचंड काम असेल.. असे सूचक विधानही मोदींनी यावेळी केले.

follow us