Download App

पंधरा दिवसांपूर्वी धमकी, फटाक्यांचे आवाज अन् धाडधाड… बाबा सिद्दीकींची हत्या कशी झाली?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Baba Siddiqui Death : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे भागात ही थरारक घटना घडली. हल्लेखोरांनी सिद्दीकी यांच्यावर 9 MM बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. सहा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांची हत्या कुणी केली, हत्येमागेचं नेमकं कारण काय, काही राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली का असे अनेक प्रश्न सध्या उभे राहिले आहेत. पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या नेमकी कशी झाली. या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं याची माहिती घेऊ या..

बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.15 ते 9.20 च्या दरम्यान हल्ला झाला होता. त्यानंतर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतली. बॉलिवूड अभिनेता सलमान खानही तातडीने रुग्णालयात दाखल झाला.

शनिवारी रात्री वांद्रे पूर्व या परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला या हत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला पहिला आरोपी हा मूळचा हरियाणातील रहिवासी आहे. तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातील आहे.

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा; मध्यरात्री सलमान खान लीलावती रुग्णालयात दाखल

या घटनेत मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट अनेक दिवसांपासून तयार केला जात होता. सिद्दीकी यांना ठार करण्याचा प्लॅन फायनल झाला. त्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळी दाखल झाले. बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी रात्री 9 वाजेपर्यंत खेरवाडी स्थित कार्यालयातच होते. यानंतर साधारण साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दोघेही बरोबरच घरी जाणार होते. मात्र जीशान सिद्दीकी आधी खेरवाडीला जाण्यासाठी निघाले.

जीशान सिद्दीकी गेल्यानंतर पाच मिनिटांनी बाबा सिद्दीकी देखील नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत कार्यालयाबाहेर पडले. आता असे सांगण्यात येत आहे की बाबा सिद्दीकी यांची कार शंभर मीटर अंतरावर उभी होती. या दरम्यान लोकांना भेटत असताना काहीतरी फुटल्याचा मोठा आवाज झाला.

फटाके फुटले असावेत असा कार्यकर्त्यांचा समज झाला. परंतु, आजूबाजूला कोणताच उत्सव सुरू नव्हता. त्यामुळे वेगळंच काहीतरी घडतंय याचा संशय बळावला. त्याचवेळी काहीतरी स्फोट होऊन धूर निघाला आणि तितक्या गोळीबाराचा आवाज आला. यानंतर कार्यकर्ते कारच्या जवळ पोहोचले त्यावेळी तीन लोक पळून जाताना त्यांना दिसले. दुसरीकडे बाबा सिद्दीकी मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

Baba Siddiqui Death : मोठी बातमी! बाबा सिद्दीकींची गोळी झाडून हत्या

तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. दोन बंदुकींतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले होते. त्यापैकी तीन गोळ्या सिद्दीकींच्या छाती लागल्या होत्या. दोन गोळ्या त्यांच्या कारवर लागल्या. एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्याबरोबर तेथे हजर असलेल्या आणखी एका व्यक्तीला गोळी लागली. या व्यक्तीवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. बाबा सिद्दीकी यांची कार बुलेटप्रुफ होती. मात्र तरीही गोळी काचेत घुसली. त्यामुळे हल्लेखोरांकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे बाबा सिद्दीकींना पंधरा दिवसांपूर्वीच धमकी मिळाली होती. त्यामुळे त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तरी देखील त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

follow us