मुंबई : देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन माझ्यासमोर झालेला नाही. असं सुचूक विधान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. तुमच्या परस्पर असे काही झाले असेल का? यावर अजित पवार यांनी थेट उत्तर दिले नाही. माझेकडे जे खाते नाही त्यात मी ढवळाढवळ करीत नाही, असं म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. एबीपी माझाच्या एका मुलाखतीत अजित पवार बोलत होते.
मी फडणवीसांसोबत शपथ घेतली होती त्यामुळे नाराज आहे असं म्हटलं जाते पण मी अशा आरोपांकडे लक्ष देत नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच सर्वच वाचळवीरांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला. पक्षातील वरिष्ठांनी आपआपल्या नेत्यांचे कान टोचून अशी भाषा वापरायची नाही हे बजावायला हवं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
‘त्या’ मुलांवर कारवाई नको, जे घडलं त्याकडे दुर्लक्ष करावं
अजित पवार म्हणाले, फडणवीसांना जेलमध्ये टाकणार ही बातमी वाचली आहे. पण माझ्या उपस्थित अशाप्रकारची कोणतीही मिटिंग झालेली नाही. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची जेव्हा जेव्हा मिटिंग झाली त्यामध्ये हा विषय कधीही नव्हता. आता फडणवीसांकडे गृहखाते आहे त्यांना ही माहिती कोणाकडून मिळाली हे मला माहिती नाही, असे अजित पवारांनी सांगितले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची कोणालाही कल्पना नव्हती. प्रत्येकाला वाटले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथराव उपमुख्यमंत्री होतील. राजकारणात कधी काय घडेल. कधी आजचा शत्रू उद्याचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू होईल हे सांगता येत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.