मुंबई : मुंबईतील लोकसभेच्या सहा मतदारसंघांच्या जागावाटपावरुन भाजप-शिवसेनेत वाद उभा राहण्याची शक्यता आहे. भाजपने मुंबईतील चौथ्या मतदारसंघावरही दावा ठोकला आहे. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य या सोबतच शिवसेनेच्या ताब्यात असलेला दक्षिण मुंबई या मतदारसंघावर भाजपने (BJP) दावा सांगितला आहे. इथून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. (Along with North Mumbai, North West Mumbai, North-Central, BJP has claimed the constituency of South Mumbai which is held by Shiv Sena)
दक्षिण मुंबई हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद सावंत खासदार आहेत. परिणामी हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा असा शिवसेनेचा दावा आहे. नुकतेच या मतदारसंघातील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदेंना सावंतांविरोधात तगडा उमेदवार मिळाल्याचे बोलले जात आहे. पण आता भाजपने या मतदारसंघावरच दावा ठोकल्याने देवरा शिवसेनेत येऊन फसले का असा सवाल उपस्थित होत आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सोडणार नसल्याचे आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी अंतिम असल्याचे स्पष्ट झाल्याने देवरा यांनी काँग्रेसला राम-राम केला. मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. मात्र त्यांचा 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळी शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी एक लाख मतांच्या फरकाने पराभव केला आहे. पण शिवसेनेत प्रवेश करत ते आता पुन्हा एकदा अरविंद सावंत यांच्याविरोधात या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दक्षिण मध्य :
2009 सालचा अपवाद वगळता 1989 पासून दक्षिण मध्य हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. वामनराव महाडिक यांनी पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकविला. त्यानंतर मोहन रावळे यांनी पाचवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2009 ला एकनाथ गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मतदारसंघात विजय नोंदविला. त्यानंतर 2014 पुन्हा राहुल शेवाळे यांनी दोनवेळा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे.
दक्षिण :
दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत मुरली देवरा या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. त्यांच्यानंतर मिलिंद देवरा यांनीही 2004 आणि 2009 असे दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र 2014 आणि 2019 मध्ये मिलिंद देवरा यांचा पराभव करत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी हा मतदारसंघ सेनेकडे खेचून आणला.
उत्तर :
उत्तर लोकसभा मतदारसंघावर भाजपची घट्ट पकड आहे. 1989 पासून 2004 आणि 2009 चा अपवाद वगळता तब्बल सातवेळा भाजपने इथून विजय मिळविला आहे. यात 1989, 1991, 1996, 1998 आणि 1999 असे पाचवेळा राम नाईक यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर 2004 मध्ये अभिनेता गोविंदा आणि 2009 मध्ये संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या तिकिटावर इथून विजय साकारला. 2014 मध्ये भाजपने पुन्हा एकदा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. 2014 आणि 2019 असे सलग दोनदा गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला.
उत्तर पूर्व :
उत्तर पश्चिम हा मतदारसंघ कधी काँग्रेस तर कधी भाजपकडे राहिला आहे. काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी चारवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर भाजपकडून 1989 साली जयंवतीबेन मेहता, 1996 साली प्रमोद महाजन, 1999 साली किरीट सोमय्या यांनी विजय मिळविला. 2009 साली संजय दिना पाटील यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर केला होता. त्यानंतर 2014 किरीट सोमय्या आणि 2019 मध्ये मनोज कोटक यांच्या रुपाने पुन्हा भाजपने हा मतदारसंघ खेचून घेतला.
उत्तर मध्य :
उत्तर मध्य हा मतदारसंघ 2004 पर्यंत कधीच एका पक्षाच्या ताब्यात नव्हता. कधी शिवसेना, कधी काँग्रेस, कधी रिपब्लिकन पार्टी अशा पक्षांनी इथून विजय मिळविला. 2004 मध्ये एकनाथ गायकवाड आणि 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेतला. तर 2014 आणि 2019 मध्ये पुनम महाजन यांनी भाजपच्या तिकीटावर या मतदारसंघातून विजय मिळविला.
उत्तर पश्चिम :
उत्तर पश्चिम हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. सुनील दत्त यांनी इथून पाचवेळा विजय मिळविला आहे. तर 2005 च्या पोटनिवडणुकीत प्रिया दत्त आणि 2009 मध्ये गुरुदास कामत यांनी एकदा विजय साकारला. मात्र 2014 आणि 2019 मध्ये गजानन किर्तीकर यांनी इथून विजय मिळविला.