Badlapur Encounter Updates : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने (Akshay Shinde)पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. तर अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेवर अक्षयच्या आईवडिलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
Badlapur Encounter: गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद, शरद पवारांची प्रतिक्रिया…
माझ्या मुलाला मारून टाकण्यात आलं. त्याला साधा फटाकाही फोडता येत नाही, तो बंदूक काय चालवणार? असा सवाल अक्षयच्या आईने केला आहे. अक्षयच्या आईवडिलांनी या प्रकरणावरच संशय व्यक्त केल्यानं खळबळ उडाली.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची माहिती मिळताच त्याची आई म्हणाली की, माझा पोराची वाट बघतेय. माझा पोरगा असं करूच शकत नाही. कामावर गेले तर रस्ता क्रॉस करतानाही मी त्याचा हात धरत असेल. रस्ता क्रॉस करताना गाड्या येतात, त्यांनाही घाबरत होता. तो कसा काय गोळीबार करेल? असा सवाल अक्षय शिंदेच्या आईने केला आहे.
माझ्या पोराला गोळ्या घालून ठार मारलं. आता आम्हालाही मारून टाका, असं अक्षयच्या आईने म्हटलं.
तर अक्षय शिंदेला मी साडेतीन वाजता भेटून आलो. अक्षयला पैसे घेऊनच मारून टाकले. त्याला पिचकारीची बंदूक माहिती नाही, मग तो काय पोलिसांची बंदूक घेऊन फायर करणार? असा सवाल अक्षयच्या वडिलांनी केला.
दरम्यान, अक्षय शिंदे हा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी होता. त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले होतं. ही घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी या प्रकरणाच्या विरोधात बदलापूरमध्ये मोठा बंद पाहण्यास मिळाला होता. बदलापूर बंदमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. बदलापूरकरांनी 9 तास रेल्वे रोकोही केला होता. आता पोलिसांच्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे.