मुंबई : मंत्रालय (ministry) बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा निनावी फोन आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे. मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, असं कॉल करून एका व्यक्तीने सांगिल्यानंतर मंत्रालयात पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे हा निनावी फोन अहमदनगर मधून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. या कॉल नंतर पोलीस सतर्क झाले. गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याची धमकी मिळाल्यानं पोलिसांनी तातडीने मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली. मंत्रालयामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. श्वान पथकही मंत्रालयात दाखल झाले आहे. पोलिस मंत्रालयाच्या प्रत्येक कोपऱ्यात तपास करत आहेत आणि सर्व ठिकाणांची नीट तपासणी करत आहेत.
मला वाटलं विखे भाजपात काम करतील की नाही… चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?
दरम्यान, मंत्रालयात धमकीचा फोन करणारी व्यक्ती मूळचा अहमदनगरचा आहे, असं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. बाळकृष्ण ढाकणे असं या धमकी देणाऱ्या व्यक्तीचे आहे. या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क आणि संवाद साधायचा आहे. ही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्र्यांशी संपर्क करू शकली नाही तेव्हा त्रस्त होऊन ही धमकी दिली. मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून देण्याची इच्छा या व्यक्तीने केली होती. बोलणं करून दिलं नाही तर मंत्रालयात ठेवलेल्या बॉम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी त्याने दिली.
या धमकीच्या फोननंतर मंत्रालयाच्या संपूर्ण परिसराची आणि इमारतीची तपासणी केली असता बॉम्ब कुठेच नसल्याची पोलिसांनी खात्री केली. कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्यांनी घाबरुन जावू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.