मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली होती. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप सुनील राऊत यांनी माध्यमांमध्ये प्रसारित केली होती. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर तपास करुन एका व्यक्तीला अटकही करण्यात आली होती. मात्र संजय राऊत यांनी धमकीचा हा सगळाच बनाव रचला होता असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काही फोटो दाखवत धमकी देणारा हा राऊत यांचाच कार्यकर्ता असल्याचा दावा केला. (Bjp mla Nitesh Rane allegations on Shivsena MP Sanjay Raut)
आपल्याला आठवतं असेल की शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांना एक धमकी आली होती. जीवे मारण्याची धमकी आली होती. सुनील राऊत यांच्याकडून एक कॉल रेकॉर्डिंग आपल्याला ऐकायला मिळाली. यात त्यांना धमकी देण्यात आल्याचं दिसून येत होतं. पण मी सातत्याने सांगतं आहे की, एका मच्छराला मारण्यासाठी धमकी देण्याची काहीच गरज नाही. मुळातच हा संजय राजाराम राऊत एक 420 असल्यामुळे सगळ्याच बाबतीत खोटारडा आणि भंपक माणूस आहे.
काल काहीतरी मुंबई पोलिसांनी एका मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केलेली आहे. आता हा मयुर शिंदे म्हणजे नेमकं कोण? याचं उत्तर सांगताना राणे यांनी काही फोटो दाखवत सुनील राऊत आणि संजय राऊत यांच्या बाजूला उभी असलेली व्यक्ती ही मयुर शिंदे असल्याचा दावा केला. तसंच संजय राऊत आणि सुनील राऊत हे भामटे असल्याचं म्हणतं खोटं बोलतं पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरतात असा आरोप केला. दाऊद पासून सगळ्यांची भाषा करणाऱ्या राऊतांच्या रक्तातच खोटं बोलणं आणि गद्दारी करणं आहे.
स्वतःच्याच कार्यकर्त्याकडून स्वतःलाच धमकी द्यायला लावायची आणि स्वतःच तो कॉल रेकॉर्ड करुन तो व्हायरल करायचा. यानंतर माझ्या जिवाला धोका आहे असं म्हणून फडणवीस साहेबांवर टीका करायची. म्हणून मी वारंवार म्हणतोय संजय राऊत पुन्हा एकदा तुरुंगात दिसणार आहेत. लवकरच ते कैदी नंबर ८९५९ चा युनिफॉर्म घालणार आहेत आणि सकाळी 4 वाजता बाथरुमसाठी भांडताना दिसणार आहेत. त्यामुळे अशा खोटारड्या लोकांचं पोलीस संरक्षण काढून घ्यावं अशी मी मागणी करतो असे राणे म्हणाले.