मुंबई : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके (Prof. Hari Narke) यांचे आज हृदयविकारचाच्या झटक्याने निधन झाले. संशोधक, व्याख्याते, लेखक म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळं संशोधक, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होते. दरम्यान, प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला, अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शोक व्यक्त केला. (Chhagan Bhujbal sentimnet statment on Hari Narke they said Narke Death is a big loss for OBC movement Chhagan Bhujbal)
मंत्री भुजबळ यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिलं की, ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. ते आज आपल्यात नाहीत, ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला.
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. ते आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू… pic.twitter.com/JhYVny9Dia
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) August 9, 2023
मराठी साहित्य क्षेत्रात अतिशय मोलाचे कार्य असणाऱ्या प्रा. हरी नरके यांनी देशाच्या ओबीसी चळवळीत वैचारिक प्रबोधन करून समाजात जनजागृती करण्याचे मोठे काम केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत त्यांनी संघटनेसाठी भरीव काम केलं. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना राज्यात आणि देशभरात वैचारिक प्रबोधन करत संघटन अधिक मजबूत केले.
प्रा. हरी नरके यांनी पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन केंद्रात प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. आपल्या विपुल लेखनाने त्यांनी साहित्य क्षेत्रात अमिट असा ठसा उमटलवला होता. विशेषतः महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर संशोधनपर साहित्याची निर्मिती केली. याबाबत जगभरात त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने देखील दिली. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलगु याप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीमध्ये प्रमुख समन्वयक म्हणून महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.
प्रा.हरी नरके यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा समता पुरस्कार तसेच सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अनेक शासकीय आणि देशपातळीवरील त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्था, संघटनांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या निधनाने साहित्य, कला, सांकृतिक, सामाजिक क्षेत्राची तसेच ओबीसी आणि परिवर्तनवादी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे अशाही भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.