मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी रवाना झाले आहेत. या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.
“या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक व्हावी, यासाठी संपूर्णपणे प्रयत्नशील राहीन.” अशा शब्दात ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्याची माहिती दिली आहे.
स्वित्झर्लंड देशातील डाव्होस येथे वर्ल्ड ईकोनिमिक फोरम विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी आज प्रयाण करतोय. या परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडताना २० उद्योगांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.#WorldEconomicForum #Davos pic.twitter.com/RgieJSoYL5
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 15, 2023
एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील 20 उद्योगांसमवेत चर्चा करणार असून त्यातून राज्यासाठी सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर गुंतवणूकदार तसेच अनेक मोठ्या उद्योगांच्या प्रमुखांबरोबर ते संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यावेळी 16 आणि 17 जानेवारी असे दोन दिवस ते या परिषदेमध्ये उपस्थित राहणार असून त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारीही असणार आहेत. ही परिषद 20 जानेवारी पर्यंत चालणार असून जागतिक पातळीवरील अनेन बड्या बड्या उद्योगाबाबत चर्चा केली जाणार आहे.
सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दावोसला जाणार होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे त्यांनी ऐनवेळी दौरा रद्द केल्याची चर्चा आहे. पण याच वेळी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दोनच दिवसामध्ये परत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस. सरकार आल्यानंतरचा पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.