मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने 22 जागांवर दावा केला आहे. शिंदे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व काल (16 ऑक्टोबर) खासदारांची बैठक आयोजित केली होती. निवडणूक रणनीती, प्रचार, प्रलंबित असलेले प्रश्न आदी मुद्द्यांबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. याच बैठकीनंतर बोलताना शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी जागांबाबत भाष्य केले. (Chief Minister Eknath Shinde’s Shiv Sena has claimed 22 seats for the upcoming Lok Sabha elections)
खासदार किर्तीकर म्हणाले, गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने ज्या 22 जागा लढविल्या होत्या, त्या सर्व जागा आम्हाला सोड्याव्यात अशी आमची भूमिका आहे. आम्ही या जागांवर संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराच्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. शिवाय आपणही आपल्या वायव्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून तब्येतीमुळे किर्तीकर निवडणूक लढविणार नसल्याच्या चर्चा होत्या, यावर त्यांनी पूर्णविराम दिला.
शिवसेनेने गत निवडणुकीत 23 आणि भाजपने 25 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेचे 18 जागांवरील उमेदवार विजयी झाले होते. तर भाजपचे 23 जागांवरील उमेदवार विजयी झाले होते. शिवसेनेचे 18 पैकी 13 खासदार सध्या शिंदेंच्या गटात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून शिवसेनेच्या याच 13 खासदारांना जागा सोडण्याचे भाजपचे नियोजन होते. तर उर्वरित 10 जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी आणि 25 जागा भाजप स्वतः लढविणार होता.
मात्र आता शिंदेंच्या गटाने 22 जागांवर दावा केल्याने त्यांना नेमक्या किती जागा सोडायच्या, अजित पवारांच्या गटाला किती जागा द्याव्यात आणि स्वतः किती जागा सोडाव्यात, अशा पेचामुळे महायुतीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याच्या जागांबाबत शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे किर्तीकर यांनी स्पष्ट केले.