मुंबई (प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी) : राज्याचे मुख्य सचिव असलेले मनोज सौनिक (Manoj Saunik) यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळेल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी मुख्य सचिव मनोज सौनिक आणि राज्याचे पोलीस महासंचालक हे निवृत्त होणार आहेत. या जागी कोणाची नियुक्ती होणार याविषयीची चर्चा प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मोदी सरकारचं नवीन वर्षांत मोठं गिफ्ट…पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार?
मनोज सौनिक यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पण, त्यांना कार्यकाळ वाढवून न मिळाल्यास मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत मनोज सौनिक यांच्या नंतर अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची दावेदारी आहे. पण सुजाता सौनिक यांची सेवा २०२५ पर्यंत शिल्लक आहे. त्यानंतर असलेले नितीन करीर यांची सेवा केवळ तीन महिने शिल्लक आहे. जर सौनिक यांना मुदतवाढ मिळाली तर करीर यांचं मुख्य सचिव होण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे.
राज्यसभेत ‘आप’चे नेते म्हणून राघव चड्ढांना संधी नाही, सभापतींनी फेटाळली केजरीवालांची विनंती
तर दुसरीकडे पोलीस महासंचालक असलेले रजनीश शेट हे देखील निवृत्त होत आहे. निवृत्ती पूर्वी त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी सेवा जेष्ठेनुसार रश्मी शुक्ला, संदीप बिश्नोई, विवेक फणसाळकर , प्रज्ञा सरवदे, जयजीत सिंग आणि सदानंद दाते हे प्रमुख दावेदार आहेत. राज्य सरकारने या अधिकाऱ्यांची नावे केंद्राकडे पाठवली आहेत. त्यात रश्मी शुक्ला यांची कारकीर्द फोन टॅपिंग प्रकरणामुळे अडचणीत आली आहे. हे प्रकरण गृहीत धरलं तर याचा मोठा फटका त्यांना बसू शकतो. तर संदीप बिश्मोई आणि जयजीत सिंग हे दोन्ही अधिकारी एप्रिल महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालक पदावर त्यांची नियुक्ती होणे अशक्य आहे. त्यामुळं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पोलीस महासंचालकपदी बढती मिळू शकते.
दरम्यान, फणसाळकर यांना पोलीस महासंचालक केले तर रश्मी शुक्ला यांना पोलीस आयुक्तपदी नियुक्ती मिळू शकते. पण शुक्ला पोलीस आयुक्त झाल्या तर विरोधकांच्या हाती मोठं कोलित मिळू शकते. त्यामुळं मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती होते, हेच पाहणं महत्वाचं आहे.