Download App

माहीमचा तिढा, राज ठाकरेंसोबत संबंधांत दुरावा? शिंदे म्हणाले, राजकारणात..

राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. आम्हा दोघांत कधी वाद होऊ नये अशी आमच्या दोघांचीही इच्छा असते.

Eknath Shinde on Raj Thackeray : राज्यात मुंबईतील माहीम मतदारसंघाची बरीच चर्चा झाली. याचं कारण म्हणजे या मतदारसंघात मनसेनं अमित ठाकरेंना (Amit Thackeray) तिकीट दिलं. भाजपनं अमित ठाकरेंना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनीही (Eknath Shinde) या मतदारसंघात उमेदवार न देता पाठिंबा द्यावा असं अपेक्षित होतं. मात्र शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संबंधांत दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघावरून (Mumbai News) राज ठाकरे आणि तुमचे संबंध गडबडलेत का? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर शिंदे म्हणाले, आमच्यात कम्युनिकेश गॅप नक्कीच झाला आहे. माहीम मतदारसंघावरून थोडा दुरावा निर्माण झाला. राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. मी सुद्धा मुख्यमंत्री आणि पक्षाचा प्रमुख आहे. मलाही कार्यकर्त्यांना जपायचं आहे. पक्ष चालवायचा आहे.

मी त्याच वेळी राज ठाकरेंना विचारलं होतं माहीमच्या तिढ्यावर CM शिंदे स्पष्टच बोलले..

काही गोष्टी अशा असतात ज्यांची चर्चा वेळेवर व्हायला हवी. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. आम्हा दोघांत कधी वाद होऊ नये अशी आमच्या दोघांचीही इच्छा असते. राज ठाकरे आणि माझ्यात कोणतेच मतभेद किंवा विसंवाद नाही. पण राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महायुतीने शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी त्यांना एक खास ऑफर देण्यात आली होती. सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घेतल्यास त्यांना विधानपरिषदेची संधी मिळणार होती. मात्र या ऑफरवर सदा सरवणकर यांचा काय प्रतिसाद राहिला याची माहिती मिळाली नाही. पण त्यांनी उमेदवारी काही मागे घेतली नाही. त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

आशिष शेलारांनी घेतला यू-टर्न; माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, म्हणाले, सदा सरवणकर हेच महायुतीचे

follow us