महाविकास आघाडीतील लोकसभा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर कोण मोठा भाऊ यावरूनही मविआच्या नेत्यांमध्ये खटके उडत आहे. त्यात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी महत्वाची बैठक मुंबईत बोलविण्यात आलेली आहे.
गडकरींच्या खात्यावर फडणवीसांचा डोळा?; शायराना अंदाजातून सांगितली सुप्त इच्छा
मुंबईतील टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाचा सर्वबाजूने विचार केला जाणार आहे.
धर्मांध व जातीवादी भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असून आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा पक्षाचा निर्धार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहे.
तिकीटवाटपाच्या चर्चा! भुजबळांनी थेट फॉर्म्युलाच सांगून टाकला
तसेच लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहे.
नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश व कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने भरघोस मतदान करत विजयी केले आहे. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाला धूळ चारली जाईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.