मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकारणी वादात सापडलेले ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांचा कार्यभार काढून घेण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सभागृहात केली आहे.
काही दिवसांपूर्वी वादात सापडलेले महेश आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात विधानसभेत आवाज उठवला होता. यानंतर उदय सामंत यांनी कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे.
कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आहेर यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु विरोधकांकडून सातत्यानं अहिर यांना निलंबित करण्याची मागणी होतं होती. अखेर विधान परिषदेत मंत्री उदय सामंत यांनी त्यांचा कारभार काढून घेणार असल्याची सभागृहात घोषणा केली.
राजू शेट्टींची मोठी घोषणा ! कार्यकर्त्यांना म्हणाले, तयारीला लागा लोकसभा निवडणूक..
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला व जावयाला मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावरुन आव्हाड यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवरुन आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका सहआयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली होती. त्यानंतर आव्हाड व त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.