मुंबई : “आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारही नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्तुत्तर दिले. ठाकरेंनी आज (24 जून) शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करताना फडणवीसांना परिवारावर न बोलण्याचा सल्ला दिला होता. तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या व्हॉटसअप चॅट बद्दलही भाष्य केले होते. यावरुनच आता फडणवीसांनी ठाकरेंना ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिले आहे. (DCM Devendra Fadnavis warning to shivsena ubt chief Uddhav Thackeray on Family criticize)
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे, उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !
ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 24, 2023
चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
➡️ सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…
➡️ मुंबईला कुणी लुटले यावर…
➡️ मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर…
➡️ मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
➡️ 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारही नाही (नड्डे म्हणजे घसा)
तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…
काल बिहारची राजधानी पाटण्यामध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पाटण्यातील विरोधकांची बैठक मोदी हटावसाठी नसून परिवार बचाव बैठक आहे. सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आले असून, या बैठकीचा मुख्य उद्देश आपला परिवार कसा वाचू शकेल आणि कशी सत्ता आपल्याकडे राहू शकेल हा आहे. एकत्रित आलेल्या सर्व पक्षांसाठी सत्तेत आल्यानंतर राज्य चालवणे म्हणजे धंदा असल्याचा थेट आरोपही फडणवीसांनी केला. फडणवीस यांच्या याच टीकेवर ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
काल मी बैठकीला गेलो होतो. त्यावर लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवरावर बोललो तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसन तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल.
त्यामुळे परिवारावर बोलू नका. कारण मी माझ्या परिवारासाठी मी संवेदनशील आहे आणि प्रत्येकजण माझा परिवार आहे. सुरज सुद्धा माझा परिवारच आहे. सर्व शिवसैनिक माझा परिवार आहे, संपूर्ण महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोणी घेत असेल तर तुमचं तुम्हाला माहिती, पण माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. मी माझं कुटुंब जपणार आहे. हे माझं कुटुंब माझ्या सोबत आहे. त्यामुळे परिवार बचाव वगैरे बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असा गर्भित इशारा ठाकरे यांनी फडणवीस यांना दिला. आता ठाकरे यांच्या याच टीकेवर फडणवीस यांनी प्रत्तुत्तर दिले आहे.