Download App

अखेर नागरिकांच्या आंदोलनाला यश; मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला २ दिवसांची स्थगिती

एल्फिन्स्टन ब्रीज तोडल्याने आजूबाजूचे जे नागरिक आहेत, जे बाधित होणार आहेत , त्यांनी आधी आमचं पुनर्वसन करा, अशी मागणी

  • Written By: Last Updated:

Elphinstone Bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिली आहे. तोडकामाला स्थगिती देण्याचा (Bridge) निर्णय समोर आल्यानंतर यासंदर्भात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांकडून तूर्तास आंदोलन मागं घेण्यात आलं आहे. याप्रकरणी सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात येईल असं एमएमआरडीए अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

काल, शुक्रवार 25 एप्रिलला एमएमआरडीएने एल्फिन्स्टन ब्रीज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला येथील स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध दर्शवला. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे. पुढचे दोन दिवस म्हणजेच सोमवारपर्यंत हा ब्रीज सुरू राहणार असल्याचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं. त्यामुले स्थानिकांचे आंदोलन तूर्तास थांबलं आहे. सोमवारी आता यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल.

देश दु:खात अन् भाजप नेते सोहळे करताहेत, लाज कशी वाटत नाही?, कॉंग्रेसची टीका

काल ब्रीज बंद करून आजपासून पाडकाम करण्याचा निर्णय घेतल्यावर संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मोठमोठाले जेसीबी दाखल झाले, पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. ब्रीजचाा डिव्हायर तोडण्याचंही काम सुरू झालं होतं. मात्र, ब्रीज बंद करण्याच्या निर्णयाविरोधात प्रभादेवी-परळमधील स्थानिक नागरीक रस्त्यावर उतरले होते. ते रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते. हा निर्णय मागे घेण्याची मागणीदेखील करण्यात येत होती.

एल्फिन्स्टन ब्रीज तोडल्याने आजूबाजूचे जे नागरिक आहेत, जे बाधित होणार आहेत , त्यांनी आधी आमचं पुनर्वसन करा, अशी मागणी केली होती. काल रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर त्यांचं आंदोलन सुरूच होतं. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर कालिदास कोलंबकर यांनी हा निर्णय दोन दिवसांसाठी स्थगित करणार येणार असल्याचं सांगितलं. दोन दिवसांनंतर सोमवारी बैठक घेऊन, त्यावर पुढचा निर्णय घेण्यात येईल असं नमूद करण्यात आलं. त्यानंतर नागरिकांचे आंदोलनही तूर्तास थांबवण्यात आलं आहे.

का होतोय विरोध ?

शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतूला-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी वरळी कनेक्टरचे काम लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी तेथे डबल डेकर ब्रीज बांधण्यात येणार आहे. पण तेथे पिलर उभा करण्यासाठी एल्फिन्स्टन रोडवरील इमारती रिकाम्या करण्याचेय आदेश एमएमआरडीएने दिल होते. या विभागातील 19 इमारतींना नोटीस देण्यात आली. त्या इमारती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यामुळे नागरिक संतापले आणि रस्त्यावर उतरले. ब्रीज तोडण्याचे काम सुरू करण्यापूर्वी आधी आमचे पुनर्वसन करा अशी मागणी करत स्थानिक नागरिकांनी काल रात्री उशीरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं होतं. आता मुख्यमंत्री कार्यालायतून फोन आल्यावर दोन दिवसांसाठी तरी पुलाच्या पाडकामाला स्थगिती देण्यात आली असून सध्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. दोन दिवसांनी बैठकीत काय निर्णय होईल, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

follow us

संबंधित बातम्या