Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप निर्णय आलेला नाही. शिंदे यांच्यासह आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. एकनाथ शिंदे अपात्र होतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदे जरी अपात्र ठरले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील. आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे विधान फडणवीस यांनी केले.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तरी तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. शिंदेंना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिल. एकतर शिंदे अपात्र होणारच नाहीत. पण जरी कदाचित तसं घडलं तरीही ते विधानपरिषदेवर येऊ शकतात. ज्याला कोर्ट समजतं. कोर्टाची ऑर्डर समजते. ज्याने सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचली असेल. ज्याने निवडणूक आयोगाची ऑर्डर वाचली असेल तो शंभर टक्के सांगेल की शिंदे अपात्र होणार नाहीत, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.
आम्ही कुठेच कायदा मोडला नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. ते विधानपरिषदेवर येतील. त्यात अडचण काय. तरीही ते अपात्र होतच नाहीत. आमची संख्या अशी आहे की कुणीही डिस्क्वॉलीफाय झालं तरी अडचण नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत काम केलं आहे. कुठेही तसूभरही कायद्याची चौकट मोडलेली नाही. विचारपूर्वक नियमात बसून काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही भीती नाही, असे फडणवीस म्हणाले. विधानपरिषदेवर घेतले जाईल असे सांगितले असले तरी अपात्र झाल्यानंतर आमदारांचं काय होणार हा प्रश्न कायम आहे.
राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना
आमदार अपात्रता प्रकरणात सल्लामसलत करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. हा माझा पूर्वनियोजित दौरा होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांना नोटीस ही अपात्रतेबाबतची आहे. छाननी झालेली आहे. त्यानुसार नोटीसा दिल्या गेल्या आहेत. वेळापत्रक बदलाबाबत कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे. हा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असे नार्वेकर म्हणाले.