आरक्षण नाही तर उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीला नो एन्ट्री, पूजेला आल्यास काळे फासू; मराठा समाजाचा इशारा

  • Written By: Published:
आरक्षण नाही तर उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीला नो एन्ट्री, पूजेला आल्यास काळे फासू; मराठा समाजाचा इशारा

पंढरपूर : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात (Vitthal temples of Pandharpur) भाविकांची मांदियाळी असते. दरवर्षी कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मात्र, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदा शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा, असा पेच विठ्ठल मंदिर समितीसमोर निर्माण झाला. अशातच आता कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता शेतकऱ्याच्या हस्ते करावी, असे पत्र सकल मराठा मोर्चाने मंदिर समितीला दिलं.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या दिड महिन्यापासून आंदोलन करत आहे. त्यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, अद्याप आरक्षण मिळाले नाही. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी वातावरण तापलं. सकल मराठा समाज बांधव चांगलेच आक्रमक झालेत. जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आली आहे. याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याच्या हस्ते पूजा करा, आरक्षण न देता कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू असा इशारा समितीने दिला.

कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी करतात. गेल्या वर्षी कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर आषाढी एकादशीच्या पूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाला होता.

Cash For Query : होय, हिरानंदानीला लॉगइन आयडी, पासवर्ड दिला होता; मोईत्रांनी कारणही सांगितलं 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले. सध्या राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत. दोन उपमुख्यमंत्री असल्याने आता महापूजा कोण करणार, असा पेच तयार झाला असतांना एकाही मंत्र्याला येऊ न देण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला. कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांऐवजी शेतकऱ्यांनी करावी, अशी मराठा समाजाची मागणी आहे. उपमुख्यमंत्र्याना महापूजेचा मान न दिल्यास मंत्र्यांची नाराजी मंदिर समितीला परवडणारी नाही. त्यामुळे आता मंदिर समिती काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube