मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली पण त्यांच्या सभेचे मैदान भरले नाही. बाळासाहेबांनी संभाजीनगरमध्ये दंडवत घातला होता पण तुम्ही तर काँग्रेससमोर लोटांगण घातले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप त्यांनी केलं हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या मनाला देखील वेदना झाल्या असतील. आपण काय केलं आणि हे काय करतात, अशी टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते मुंबईतील विक्रोळी येथे शिवसेनेच्या शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
दरवेळी मुंबईतले डांबराचे रस्ते दुरुस्त केले जायचे पण त्यातून काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळ व्हायचं. आता सिमेंटचे रस्ते होतील आणि पुढच्या दोन वर्षात सगळे रस्ते सिमेंटचे करणार आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना पोटदुखी सुरु झालेली आहे. त्यांचा इलाज पण बाळासाहेब ठाकरे दावाखान्यातून केला आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
Uddhav Thackeray : चोरांना घेऊन भाजप निवडणूक लढवणार का?
गेले अनेक वर्षे मुंबईकरांना सोईसुविधा देण्याचे काम करायला पाहिजे होतं दुर्दैवाने ते झालं नाही. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्यामुळे मुंबई स्वच्छ आणि सुंदर होईल. आम्ही आल्याबरोबर सिमेंटचे रस्ते करायला सुरुवात केली. त्यासाठी साडेसहा हजार कोटींचे टेंडर निघाले आहे. पावसाळ्याअगोदर सगळे कामे होतील. महापालिका आयुक्तांना चांगल्या दर्जाचे कामं करण्याचे सांगितले आहे. लोकांना खड्डे मुक्त प्रवास द्या, ही मुंबई आपल्याला खड्डे मुक्त करायची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीची राज्यातील सर्वांत मोठी वज्रमुठ सभा आज छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या जाहीर सभेला ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षातील अनेक बडे नेते उपस्थित होते. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गट आणि भाजपचा जोरदार समाचार घेतला.