मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत देसाई (Suryakant Desai) डोंबिवलीत मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. म्हणूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. देसाई यांच्यावर डोंबिवलीतील (Dombivli) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
अधिक माहितीनुसार, व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णालयाने देसाई यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास कुटुंबियांना सांगितले. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात देसाई यांना घेऊन जात असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडली. यानंतर रुग्णवाहिका ढकलण्याची वेळ देसाई कुटुंबीयांवर आली.
Bachhu Kadu असे का म्हणाले? भटके कुत्रे उचला अन् आसामला नेऊन टाका!
शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व येथील एका हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. त्यानंतर देसाई कुटुंबियांनी मंजुनाथ शाळेपर्यंत रुग्णवाहिका ढकलत नेली. या पार्श्वभूमीवर देसाई यांचा मुलगा ऋषिकेश याने साई पूजा रुग्णवाहिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही सांगितले आहे.
माजी आमदार सुर्यकांत देसाई हे सन 1995 ते 2000 या काळात परळ-लालबाग विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. गेली 23 वर्ष देसाई हे डोंबिवली पश्चिम येथील भागशाला मैदान या भागात वास्तव्यास होते.