Maharashtra Politics : राज ठाकरे महायुतीत येणार का हे अद्याप ठरलेलं नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मनसे नेत्यांनी दिली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) उपस्थितीत मनसे नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीआधी महायुतीला धक्का देणारे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी (Ramdas Athawale) केले आहे. राज ठाकरेंना एनडीएत घेण्याची आवश्यकता नाही असे मंत्री आठवले यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीवर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, आमची भूमिका अशी आहे की राज ठाकरे यांनी सोबत घेण्याची गरज नाही. राज ठाकरेंबाबत भाजप काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागणार आहे. राज ठाकरे यांनी युतीसाठी अमित शाह यांची भेट घेतली असे वाटत नाही. मात्र राज ठाकरे सोबत आल्याने फार फायदा होईल असे वाटत नाही.
Ramdas Athawale : शिर्डीच्या जागेवर आठवले ठाम! ‘आरपीआय’च्या मागणीनं भाजपची डोकेदुखी
सध्या एनडीए आघाडीत नेत्यांचं इनकमिंग वाढलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते सत्ताधारी पक्षांत दाखल होत आहेत. सध्या काँग्रेसमधून इतके लोक बाहेर पडले आहेत की आता सोनिया गांधी आणि राहुल गांधीच फक्त विरोधी पक्षात राहतील अशी स्थिती दिसत आहे. एक दिवस असा येईल की राहुल गांधींनाच इकडे यावं लागेल अशी मिश्किल टिप्पणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही मंत्री आठवले यांनी घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंना स्वतःचे आमदार सुद्धा सांभाळता आले नाहीत. त्यांनी स्वतःच्या पायांवर धोंडा मारून घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच भाजपबरोबर युती केली असती तर आज ही नामुष्की त्यांच्यावर आली नसती. मी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका.
मनसेची आज महत्वाची बैठक
दरम्यान, राज ठाकरे महायुतीत येणार का हे अद्याप ठरलेलं नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मनसे नेत्यांनी दिली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.