Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वेगात वाहत आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीत प्रत्येक पक्षातील तीन नेत्यांचा समावेश केला जाणार होता. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तिघा जणांची नावे दिली होती. मात्र, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी पटोलेंना जोरदार झटका देत ही नावेच नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील वरिष्ठांची परवानगी न घेताचे पटोलेंनी ही नावे दिली होती त्यामुळेच पटोलेंना श्रेष्ठींनी हा झटका दिल्याचे बोलले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. या निवडणुकीसाठी जागावाटप आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षातील तीन जणांची या समितीत निवड करण्यात आली आहे. या समितीत उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई यांचा समावेश आहे. शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख या समितीत आहेत.
तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील आणि नसीम खान यांची नावे देण्यात आली होती. तशी यादीही समोर आली होती. मात्र ही नावे वरिष्ठांनी नाकारली आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे आता या नावांत बदल होऊ शकतो, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ही नावे रद्द करताना काँग्रेस श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षांना जाब विचारण्यात आल्याचेही सूत्रांकडून कळाले.
आंबेडकरांसोबत जायला एका पायावर तयार! ‘इंडियाने’ डावललेल्या ‘वंचित’ला ‘एमआयएम’ची साद
काँग्रेस श्रेष्ठींनी ही यादी रद्द केल्याचे तसेच ही यादी अद्याप अंतिम नाही अशी माहिती उद्धव ठाकरे आणि अन्य मित्रपक्षांना देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून यादीवर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर या समितीतील काँग्रेसच्या सदस्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. आता नाना पटोले यांना डावलून काँग्रेस हाय कमांडकडून कोणत्या नेत्यांची नावे निश्चित केली जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.