हसन मुश्रीफांची दुहेरी कोंडी; मंत्रिपद जाणार? रुग्णालय मृत्यू प्रकरणानंतर कारखाना घोटाळा पुन्हा चर्चेत

हसन मुश्रीफांची दुहेरी कोंडी; मंत्रिपद जाणार? रुग्णालय मृत्यू प्रकरणानंतर कारखाना घोटाळा पुन्हा चर्चेत

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आधी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर रुग्णालयांमधील रुग्णांचे मृत्यू प्रकरण चर्चेत असतानाच आता त्यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित घोटाळ्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी “भाजपमध्ये काही प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यांनी हसन मुश्रीफांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी, अशी आक्रमक मागणी केली. त्यामुळे आता मुश्रीफ यांची दुहेरी कोंडी झाली आहे. (Opposition parties have gone aggressive for the resignation of Medical Education Minister Hasan Mushrif.)

सोमवारी (2 ऑक्टोबर) नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एकाच दिवशी तब्बल 24 जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातही याच घटनेची पुनरावृत्ती झाली. गेल्या पाच दिवसात नांदेडमधील मृतांचा आकडा 62 वर गेला आहे. हे सर्व मृत्यू औषधांच्या तुटवड्यामुळे झाले असल्याचा आरोप होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये ही वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंतर्गत येत असल्याने मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची थेट सीबीआय चौकशीच करा; आमदार बच्चू कडू यांची मागणी

अशात मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित घोटाळ्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे अत्यंत गंभीर निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे, असा आरोप करत वडेट्टीवर यांनी मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपमध्ये काही प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यांनी त्वरित शेतकऱ्यांना फसवणाऱ्या हसन मुश्रीफांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी, असे वडेट्टीवार ट्विटवरुन म्हणाले.

मुलभूत सेवा पुरवणं तुमची जबाबदारी, पळ काढता येणार नाही; कोर्टाने राज्य सरकारला फटकारले

प्रकरण नक्की काय ?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचे तसेच घोटाळ्याचे आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडी सध्या मुश्रीफ व त्यांच्या कुटुबीयांची चौकशी करत आहे. अनेकदा ईडीकडून त्यांच्या निवास्थानी छापेमारी झाली आहे. मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube