Download App

“मी त्याच वेळी राज ठाकरेंना विचारलं होतं”; ‘माहीम’च्या तिढ्यावर CM शिंदे स्पष्टच बोलले..

माहीम विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या तिढ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai News : महायुतीत माहीम मतदारसंघावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. या मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे यांना तिकीट दिलं आहे. भाजपने अमित ठाकरेंना मदत करण्याची भूमिका जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने येथे थेट सदा सरवणकर यांना मैदानात उतरवलं आहे. आता लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेऊन या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार मागे घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. तरी देखील सरवणकर उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

ठाकरे गटाची तक्रार अन् मनसेने हटवले कंदील; मुंबईत नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आमच्याबरोबर होते. माझी त्यांच्याशी चर्चाही झाली होती. विधानसभा निवडणुकीसाठी तुमची रणनीती काय असेल असे मी त्यांना विचारलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की आधी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीची चर्चा होऊ द्या. नंतर आपण बोलू या. पण नंतर त्यांनी थेट उमेदवारच जाहीर करण्यास सुरुवात केली.

मागील दोन ते तीन टर्मपासून आमचा तेथे आमदार आहे. सरवणकर आमचे जुने कार्यकर्ते आहेत. मी त्यांच्याशीही चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यास अतिशय आग्रही आहेत. आम्हालाही कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी लागते. कार्यकर्त्यांचं मनोबल खचणार नाही याची काळजी घेणं नेत्यांचं काम असतं असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मी निश्चितपणे सांगतो की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अशी आमची महायुती आहे. रामदास आठवलेंचा आरपीआय आणि जनसुराज्य देखील आमच्यासोबत आहेत. आम्ही एकत्रित निवडणूक लढू. बहुमत मिळवू आणि नक्की जिंकू असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, आता शिंदे यांच्या या वक्तव्यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

माहीमचा तिढा वाढला! CM शिंदेंशी चर्चेनंतरही सरवणकर ठाम; बैठकीत नेमकं काय घडलं?

सरवणकरांना विधानपरिषदेची ऑफर

यानंतर महायुतीने शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांना एक खास ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे. सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घेतल्यास त्यांना विधानपरिषदेची संधी मिळणार आहे. मात्र या ऑफरवर सदा सरवणकर यांचा काय प्रतिसाद राहिला याची माहिती मिळालेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात सदा सरवरणकर काय निर्णय घेतात. खरंच उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us