“विरोधकांना वाटत होतं की मी राजकारणातून संपलो, तेव्हा मी..”, फडणवीसांनी काय सांगितलं?

“विरोधकांना जेव्हा वाटत होते की, मी राजकारणात संपलो आहे, तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळाली

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : “विरोधकांना जेव्हा वाटत होते की, मी राजकारणात संपलो आहे, तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळाली आणि भरारी घेता आली.” असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेला फिनिक्स पुरस्कार स्वीकारताना ते मुंबईत बोलत होते.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, एबीपी माझा चॅनेलच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, सकाळ माध्यम समूहाचे संपादक निलेश खरे, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, पुढारीचे संपादक विवेक गिरधारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले,पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून लोकशाहीचे खरे हितचिंतक आहेत. समाजासमोर सत्याचे सर्व पैलू मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे तर पत्रकारांना योग्य पाठबळ देणे हे राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य आहे. लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर राज्यकर्त्यांनी टीकेला घाबरता कामा नये. टीकेसोबत सत्याची दुसरी बाजूही पत्रकारांनी निडरपणे मांडली पाहिजे.पत्रकारितेमुळे राज्यकर्त्यांना दिशादर्शन मिळते. म्हणूनच पत्रकारांना आधार देणे हे कोणत्याही सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे.

अनेकांना वाटलं माझी राख होईल, पण प्रत्येकवेळी मी.. देवेंद्र फडणवीस मनातलं बोलले

विरोधकांना जेव्हा वाटत होते की, मी राजकारणात संपलो आहे, तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळाली आणि भरारी घेता आली. हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे कारण तो माझ्या कामगिरीपेक्षा लोकांच्या विश्वासाचा सन्मान आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री श्री रविशंकर म्हणाले, टीका आणि प्रशंसेचा समतोल साधणारा माणूसच जगाच्या कौतुकास पात्र ठरतो. देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार देऊन मराठी पत्रकार संघाने योग्य व्यक्तीची निवड केली आहे. परंतु पुढील वर्षी हा पुरस्कार देताना पत्रकार संघाचा कस लागणार आहे कारण फडणवीस यांना सन्मान देऊन त्यांनीच एक उच्च मापदंड निर्माण केला आहे.

यावेळी मराठी पत्रकार संघाचे संघटक संदीप पारोळेकर, सचिव हरीभाऊ प्रक्षाळे, विवेक इनामदार, डॉ. शिबू नायर, अनिल माने, पंकज बिबवे यांच्यासह पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले.

Exit mobile version