CM Eknath Shinde Notice to Sanjay Raut : महायुतीतील भाजप आणि शिंदे गटावर अगदी त्वेषाने तुटून पडणारे खासदार संजय राऊत अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपये वाटले असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रात रोखठोक या सदराखाली लेख लिहून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केले होते. याच प्रकरणात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जे आरोप केलेत त्याचे पुरावे द्या, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशाराच या नोटीसीद्वारे देण्यात आला आहे.
Sanjay Raut : ‘देणग्या देणारे ठेकेदार हाच मोदींचा परिवार’ इलेक्टोरल बाँडवरून राऊतांचा घणाघात
राज्यातील पाच टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रात रोखठोक या सदरात एक लेख लिहीला होता. या लेखात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या लेखात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करताना निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी पैशांचा वापर केला असा आरोप केला. बेकायदा मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपये वाटले. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी कारस्थाने केली असा आरोप केला. त्यांच्या याच आरोपांवर एकनाथ शिंदेंनी नोटीस बजावली आहे. या नोटीशीची माहिती स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.
50 खोके एकदम ओके।
इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे।
गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक legal notice भेजी है.very intresting and one of the funny political document.
अब आयेगा मजा!!
जय महाराष्ट्र!
@mieknathshinde
@AUThackeray
@ECISVEEP pic.twitter.com/9CkFigfith— Sanjay Raut (@rautsanjay61) May 29, 2024
संजय राऊतांचे आरोप दिशाभूल करणारे आणि जनमानसात माझी प्रतिमा मलीन करणारे आहेत. माझ्यावर जे आरोप केले आहेत त्याचे पुरावे द्या. तीन दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा. तुमच्या आणि सामना विरोधात दिवाणी फौजदारी खटला दाखल करण्यात येईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी या नोटीसीद्वारे दिला आहे. आता या नोटीशीला संजय राऊत काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.