Devendra Fadnavis on Kalyan Dispute : कल्याण शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या मराठी माणसांना मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद आज विधीमंडळ अधिवेशनात उमटले. या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच या मारहाण करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर असे प्रकार पुन्हा सुरू झाल्याची टीकाही विरोधकांनी केली. यावर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे आणि राहिल. कधीकधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात. माज आणल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.
परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण; कल्याणमध्ये वातावरण तापलं, प्रकरण काय?
कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत आजूबाजूला राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होतो. हा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जायचा.
या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला त्रास व्हायचा. तसंच, घरात असलेली वयोवृद्ध आईलाही दम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने मराठी माणसाला अपमानित होईल असे वक्तव्य केलं आणि वाद घातला. मारामारी केली. यातून लोकांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल केला आहे. त्याला तत्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. पुढील कारवाई पोलीस करतील.
कल्याण प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, हे मराठी माणसाला हद्दपार..
एक गोष्ट सांगतो की मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे आणि राहिल. कधीकधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात. माज आणल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजपचं सरकार आलं म्हणून असं घडलं असा राजकीय रंग या प्रकरणाला देण्याचं काहीच कारण नव्हतं. मग राजकारणात जायचं झालं तर मग याचाही विचार करावा लागेल की मुंबईत बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला. कुणाच्या काळात झाला असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना विचारला.
मुंबईचं रिडेव्हलपमेंट कधी झालं. यामध्ये मराठी माणूस कुठेतरी तीनशे स्क्वेअर फुटमध्ये बसलाय आणि मोठ मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहत आहे. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की मुंबई आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी देशभरातली टॅलेंट पूल येतो. ते सगळे त्या ठिकाणी राहतात. तीन ते चार पिढ्यांपासून मुंबईत उत्तर भारतातून आलेला एखादा व्यक्ती उत्तम मराठी बोलतो. आपले सगळे सण वार साजरे करतो. मात्र काही लोकं जे माजोरडेपणाने बोलतात त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील धक्का लागतो. म्हणून मी ठणकावून सांगतो की कोणत्याही प्रकारचा अन्याय मराठी माणसावर होऊ देणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलं.