परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण; कल्याणमध्ये वातावरण तापलं, प्रकरण काय?
Kalyan Marathi family beaten : कल्याण येथील योगीधाम परिसरात अजमेरा हाईट्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना शुक्ला यांनी काही गुंड बोलावून मारहाण केली होती. (Marathi ) अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख या दोघांना परप्रांतीयांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात मराठी माणसांचा संताप पाहायला मिळाला.
बदलापूर! आरोपीच्या आई-वडिलांना रोजगार अन् घर द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी माणसांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये बॅनर लावून निषेध केला. यावेळी योगीधाम परिसरात मराठी माणसांनी गर्दी केली होती. या जमावाने अजमेरा हाईटस् इमारतीमध्ये जाऊनही घोषणाबाजी केली. हल्लेखोराला अटक केली नाही तर योगीधाम परिसरातील व्यापारी संघटनानी बंदची घोषणा केली आहे. संबंधित घटनेमध्ये कल्याण खडकपाडा पोलिसांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
योग्य कारवाई केली असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे. दरम्यान, आता पोलिसांकडून एमटीडीसीमध्ये अकाऊटंट असलेल्या मुजोर अखिलेश शुक्ला आणि त्याच्या कुटुंबावर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीत हा प्रकार घडला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत आजूबाजूला राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होतो. हा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जायचा.
या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला त्रास व्हायचा. तसंच, घरात असलेली वयोवृद्ध आईलाही दम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्ला हे या सोसायटीत वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिला आल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वीही अनेकदा मराठी माणसांविषयी अपमानजक शेरेबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुम्ही मराठी माणसे घाण आहात तुमचा वास येतो. तुम्ही मांसमच्छी खाणारे आहात. तुमच्या सारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत, अशी शेरेबाजी शुक्ला कुटुंबीयांनी केल्याची माहिती समोर येत आहे.
अखिलेश शुक्ला हे एमटीडीसीमध्ये साधे अकाऊंटंट आहे. मात्र, ते आपण IAS अधिकारी असल्याचे सांगून सोसायटीमधील रहिवाशांना धमकावायचे. तसेच ते खासगी गाडीवर IAS अंबर दिवा लावून फिरायचे. त्या गाडीचा इन्शुरन्सही 10 मार्च 2020 रोजी संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.