मुंबई-राज्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलीय. गृहविभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी अग्रीम योजने अंतर्गत 1768 कोटींची कर्जे उभारणी करण्यास मंजुरी देण्यात आलीय. ही कर्जेउभारणी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (Maharashtra State Co-operative Bank Ltd) म्हणजे राज्य सहकारी बँकेमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगले घरे मिळणार आहेत.
राज्य सहकारी बँक आर्थिक अडचणीत आली होती. परंतु बँकिग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर (Vidyadhar Anaskar) हे प्रशासक आल्यानंतर ही बँक सातशे कोटींहून अधिक नफ्यात आली आहे. आता तर पोलिसांच्या घरांसाठी कर्ज उभारणीसाठी या बँकेची निवड झाली आहे. खासगी बँक, सार्वजनिक बँका शर्यतीत असताना राज्य बँकेची निवड झाल्याने बँकेसाठी एक एेतिहासिक क्षण आहे.हे कर्ज 7.85 टक्के व्याजदराने उपलब्ध केले जाणार आहे.
अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेचा मृत्यू, हुंडा अन् संपत्तीवरून नवऱ्याबाबत मोठा खुलासा
शासनाने यापूर्वी 9781 पोलीस अधिकारी व अंमलदारांना या योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्राप्त झालेल्या घरबांधणी अग्रीम प्रस्तावाच्या आधारे आणखी 5459 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
NEET Exam : हेच प्रश्न उद्या परिक्षेत येतील ते नाशिक कनेक्शन; नीट परिक्षेचा पेपर नेमका कसा फुटला?
याकरिता गृहनिर्माण मंडळाने सर्व क्षेत्रातील बॅंकांकडून निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये अनेक राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकांनी भाग घेतला होता. परंतु या सर्वांमध्ये कमीत कमी व्याजदर व इतर आकर्षक अटी व शर्तींच्या आधारे `दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँके’ची निविदा अंतिम करण्यात आली. मागील काही वर्षात राज्य सहकारी बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीत सातत्य ठेवल्यानेच हे शक्य झाले आहे.
पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासाच्या प्रश्नावर राज्य शासनाने घेतलेल्या या महत्वाच्या निर्णयाला राज्य सहकारी बँकेने आर्थिक पाठबळ दिल्याने हजारो पोलीस कुटुंबांना स्वतचे घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे.
अशा उपक्रमांद्वारे राज्य सहकारी बॅंकेने व्यावसायिक बँकिंग बरोबरच आपला सामाजिक बँकिंगचा वसा पुढे चालू ठेवला आहे. राज्य सहकारी बँकेने प्रथमच राज्य शासनाच्या अंगीकृत संस्थांच्या टेंडर प्रक्रियेत भाग घेत तेथे यशस्वी ठरल्याबद्दल बँकेच्या सर्व कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बँकेस ही संधी दिल्याबद्दल मी शासनाचे व पोलीस गृहनिर्माण मंडळाचे आभार मानतो, असे बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी म्हटले आहे.
