Download App

मुंबईतील कोणत्या मतदारसंघात बंडखोरी कायम? कोण ठाम, कोणी घेतली माघार?

महायुती आणि महाविकास आघाडीला काही ठिकाणी बंडखोर आणि अपक्षांचे मन वळवण्यात अपयश आल्याने त्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागलं आहे .

  • Written By: Last Updated:

प्रशांत गोडसे 

(लेट्सअप प्रतिनिधी)

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्य (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निवडणुकीत आपण उमेदवार उभे करणार नसल्याचे जाहीर केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास टाकला. निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरांना रोखण्यात बहुतेक प्रमाणात यश आल. मात्र महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला काही ठिकाणी बंडखोर आणि अपक्षांचे मन वळवण्यात अपयश आल्याने त्यातील काही महत्त्वाच्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.

Vidhansabha Election : माहिममध्ये कोणाचे काम करणार? नारायण राणे थेटच बोलले, ‘आम्ही….’ 

गोपाळ शेट्टी, स्वीकृत शर्मांचा उमेदवारी अर्ज मागे
महायुतीला बोरवली आणि अंधेरी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांचे बंड शमवण्यात यश आलं. बोरवली विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाने संजय उपाध्याय यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. तर अपक्ष म्हणून भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजपा नेते विनोद तावडे यांच्या शिष्टाईला यश आलं. गोपाळ शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपचे संजय उपाध्याय विरुद्ध महाविकास आघाडी ठाकरे गटाचे संजय भोसले यांच्यात लढत होणार आहे.

पुण्यात मविआची शिष्टाई अयशस्वी, पर्वती, शिवाजीनगर अन् कसब्यात बंडखोरी कायम… 

अंधेरी पूर्व मतदार संघातून माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिंदे (शिवसेना) उमेदवार मुरजी पटेल यांची लढत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या सोबत असणार आहे.

मविआतील बाबुराव माने, मधू चव्हाण उमेदवारी अर्ज मागे
धारावी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार बाबुराव माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवार डॉ ज्योती गायकवाड यांची लढत महायुतीतील शिंदे गटाचे उमेदार राजेश खंदारे यांच्याशी होणार आहे.

भायखळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे मधू चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता खरी लढत शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे गटाच्या मनोज जामसूदकर यांच्यात पाहायला मिळणार आहे.

कुर्ला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मिलिंद कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

शिवाजी नगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघात भाजपने शिंदे गटाचे उमेदवार सुरेश पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक आणि महाविकास आघाडी समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आजमी यांच्यात तिरंगी लढत राहणार आहे.

वर्सोवात तिरंगी लढत…
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळं मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर, ठाकरे गटाचे हारून खान आणि अपक्ष उमेदवार राजू पेडणेकर यांच्यात तिरंगी लढत असणार आहे.

माहीममध्ये तिरंगी लढत…
माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार अमित ठाकरे यांना भाजपने पाठिंबा दिला असला तरी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळं माहितमध्ये अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

follow us