Download App

लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप, तीन पक्षांचे चार फॉर्म्युले

Mahavikas Aghadi Lok Sabha Election Seat Allocation Formula : लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा अवधी आहे, पण राजकीय आघाड्या आणि समीकरणे बनू लागली आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीत एकत्र निवडणुका लढवणार असले तरी जागावाटपाचा फॉर्मुला अजून ठरलेला नाही. महाविकास आघाडीत सामील असलेले तिन्ही पक्ष जागावाटपाचा आपापला फॉर्मुला मांडत आहेत, मात्र त्यांनी जिंकलेल्या जागा सोडायला कोणी तयार नाही. अशा परिस्थितीत जागावाटपाचा फॉर्मुला कसा ठरतो हे पाहावे लागेल.

ठाकरे गटाचा फॉर्म्युला
महाविकास आघाडीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) राज्यात लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा करत आहे. राज्यातून लोकसभेच्या 18 जागा आणि दादरा-नगर हवेलीसह लोकसभेच्या 19 जागा आम्ही पुन्हा जिंकू, असे संजय राऊत म्हणाले. अशाप्रकारे शिवसेना (ठाकरे गट) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 19 जागांवर दावा करत आहे.

New Parliament : विरोधी पक्षांच्या आवाहनाला 3 पक्षांचा ‘खो’; 2 संभ्रमात, औवेसी कुंपनावर

राष्ट्रवादीचा फॉर्म्युला
महाविकास आघाडीतील जागा वाटपावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले की, राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी चर्चा करावी. 2019 मध्ये भाजप किंवा इतर पक्षांनी जिंकलेल्या या जागा आहेत. गेल्या वेळी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी जिंकलेल्या 23 जागांबद्दल बोलण्याची गरज नाही. गेल्या वेळी शिवसेनेला 18, राष्ट्रवादीला 4 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. अशा प्रकारे 48 पैकी 23 जागांवर बोलण्याची गरज नाही.

काँग्रेसचा स्वतःचा फॉर्म्युला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे. पटोले म्हणतात की, लोकसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराची विजयी क्षमता जास्त असेल, त्या जागेवर भाजपविरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीच्या त्या पक्षाचा उमेदवार उभा करावा. काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणी मोठा किंवा धाकटा भाऊ नाही, या आघाडीत सर्व मित्रपक्षांची त्रिसूत्री आहे. जागावाटपावर अद्याप चर्चा झालेली नाही, मात्र जो पक्ष त्या जागेवर बलाढय़ असेल त्याने त्या जागेवर निवडणूक लढवावी, असे आमचे मत आहे.

ठाकरे-केजरीवाल भेटीवर शिंदेंचं उत्तर; म्हणाले, कितीही बैठका घ्या पण, देशात..

2019 मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. महाराष्ट्रात भाजपने लढवलेल्या लोकसभेच्या 25 जागांपैकी 15 जागा काँग्रेस आणि 9 जागा राष्ट्रवादीच्या विरुध्द लढवल्या. शिवसेनेने ज्या 23 जागांवर निवडणूक लढवली त्यापैकी 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर आठ जागांवर काँग्रेस लढत होती. अशाप्रकारे भाजपसह अन्य पक्षांच्या ताब्यातील 25 जागा वाटून घेतल्यास काँग्रेसला तडजोड करावी लागू शकते.

Tags

follow us