New Parliament : विरोधी पक्षांच्या आवाहनाला 3 पक्षांचा ‘खो’; 2 संभ्रमात, औवेसी कुंपनावर

New Parliament Building : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरुन देशातील राजकीय वातावरण तापले आहे. देशातील 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. केंद्र सरकार लोकशाहीवर आघात करत आहे तसेच संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र काही पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये माजी केंद्रीय मंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष, शिरोमणी अकाली दल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पक्षाने बुधवारी (24 मे) संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची घोषणा केली आहे.
त्याच वेळी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या पक्षांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. तर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पीएम मोदी (PM Narendra Modi) यांनी संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करू नये. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांना उद्घाटन करू द्यावे. जर पंतप्रधानांनी हे मान्य केले तर त्यांचा पक्ष या कार्यक्रमात सहभागी होईल. जर असे घडले नाही तर त्यांचा पक्षही सहभागी होणार नाही. जर पंतप्रधानांनी उद्घाटन केले तर एक चुकीची परंपरा सुरू होईल, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.
मित्र रशिया बिघडला! शस्त्रास्त्रांसह तेल पुरवठा रद्द करण्याची दिली धमकी; नेमकं कारण काय?
19 पक्षांनी बहिष्काराची घोषणा केली
नव्या संसदेच्या उद्घाटनात 19 विरोधी पक्ष सहभागी होणार नाहीत. त्यात काँग्रेस, टीएमसी, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त), मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता संघ यांचा समावेश आहे.
तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस (मणी), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, विदुथलाई चिरुथाईगल काची (व्हीसीके), मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके) आणि राष्ट्रीय लोक दल यांनी बहिष्काराची घोषणा केली आहे.