Survey : नरेंद्र मोदींसमोर राहुल गांधींचेच आव्हान! भारत जोडो यात्रेने बदलली ‘काँग्रेसच्या युवराजांची’ प्रतिमा

Survey : नरेंद्र मोदींसमोर राहुल गांधींचेच आव्हान! भारत जोडो यात्रेने बदलली ‘काँग्रेसच्या युवराजांची’ प्रतिमा

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्‍मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) संपन्न झाली. यात्रा सुरु असताना भाजपने यात्रेवर मोठी टीका केली होती. भारत आधीच जोडला गेला आहे, मग भारत जोडो यात्रेची गरज काय? असा सवाल भाजपच्या (BJP) नेत्यांनी केला होता.मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात मात्र पुन्हा धुगधुगी निर्माण झाली आहे. आधी हिमाचल (Himachal Pradesh) आणि आता कर्नाटकात (Karnataka) भाजपला सत्तेतून खाली खेचल्यानंतर काँग्रेसने स्वतःला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आणायला सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वात मोठे श्रेय राहुल गांधी यांना दिले जात आहे. (Congress Leader Rahul Gandhi can challenge Prime Minister Narendra Modi)

अशात आता एनडीटीव्ही-सीएसडीएसच्या सर्वेक्षणानुसार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा केवळ फलदायी ठरलेली नाही तर या यात्रेने काँग्रेसमध्ये नवीन चैतन्य निर्माण केलं आहे. त्याचे कारण म्हणजे जर २०२४ मध्ये भाजपचा करिष्माई चेहरा असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधींना आव्हान म्हणून उभे करण्याची काँग्रेस पक्ष तयारी करत असेल, तर त्यांची सर्वात मोठी ताकद भारत जोडो यात्रा बनली आहे. १९ राज्यांतील ७ हजार २०० लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात २०२४ मध्ये नरेंद्र मोदींना कोण आव्हान देऊ शकते, या प्रश्नावर सर्वाधिक पाठिंबा राहुल गांधी यांच्या बाजूने होता.

काँग्रेससाठी शुभ संकेत

या सर्वेक्षणातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, पुढील काळात जर विरोधी पक्षांची एकजूट दिसल्यास काँग्रेसची भूमिका मोठी असणार आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवारही काँग्रेसचाच असण्याची शक्यता आहे. तसे पाहिल्यास, भाजपसाठी सध्या काळजीचे कारण नाही. कारण सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान म्हणून बहुतांश लोकांची पसंती पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच आहे. मात्र, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या बाजूने पाठिंबा वाढत असल्याचेही नाकारुन चालणार नाही. ४३ टक्के लोकांनी मोदींना तिसरी टर्म द्यावी असे म्हटले आहे, तर २७ टक्के लोक राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी पाहु इच्छितात.

हा फरक जरी मोठा असला तरी २०२४ च्या निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहेत हेही खरे आहे. अशा स्थितीत राहुल यांच्या बाजूने असलेला जनाधार वाढत आहे, हा काँग्रेसजनांसाठी शुभ संकेत ठरु शकतो. एनडीटीव्ही-लोकनीती-सीएसडीएस सर्वेक्षणानुसार, महत्वाची गोष्ट म्हणजे २०१९ ते २०२३ दरम्यान पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता ४४ वरून ४३ टक्क्यांवर आली आहे. तर राहुल गांधींची लोकप्रियता २४ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर पोहोचली आहे.

भारत जोडोने राहुल गांधींना किती फायदा झाला?

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 27 टक्के लोकांनी राहुल गांधींना पहिल्यापासूनच पसंत करत असल्याचे सांगितले. तर १५ टक्के लोकांनी भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचे चाहते बनल्याचे सांगितले आहे. हा आकडा कमी दिसत असला तरी तो मोठा बदल दर्शवणारा आहे.काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने मोठ्या उत्साहात भारत जोडो यात्रा काढली होती. पांढरा टी-शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये राहुल गांधी शहरे आणि खेड्यापाड्यातून फिरताना, लोकांशी बोलताना दिसले. वाटेत अनेक क्षेत्रातील मान्यवरही त्यांच्यासोबत फिरताना दिसले.

१३६ दिवसांत काँग्रेसची भारत जोडो यात्रा १२ राज्यांतील ७५ जिल्हे आणि २ केंद्रशासित प्रदेशांतून गेली होती. या यात्रेचा उद्देश भारताला एकसंध करण्याबरोबरच देशाला बळकट करणे हा असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. ही यात्रा ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि सुमारे ४००० हुन अधिक किलोमीटरचे अंतर कापून १३६ दिवसांनी काश्मीरमध्ये सांगता झाली. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेसला आता २०२४ मध्येही यात्रेच्या प्रभावाची आशा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube