ठरलं तर! भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला; ‘या’ नेत्याच्या नावाची घोषणा लवकरच

मंत्रिमंडळातून डावलले गेलेले आमदार रवींद्र चव्हाण हेच प्रदेशाध्यक्ष होतील असे जवळपास निश्चित झाले आहे.

Bjp

Bjp

Maharashtra Politics : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता सरकारचं कामकाज सुरू झालं आहे. भाजपाचे आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता मंत्री झाले आहेत. त्यांना थेट महसूलमंत्री पद देण्यात आलं. त्यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण होणार असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तरही आता मिळालं आहे. मंत्रिमंडळातून डावलले गेलेले आमदार रवींद्र चव्हाण हेच प्रदेशाध्यक्ष होतील असे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या नावाची फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी राहिले आहे. त्यांच्या नावाची घोषणा लगेच होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही.

कार्यकर्ता भाजपाची खरी शक्ती, राज्यात पुन्हा महायुती सरकार, मंत्री रवींद्र चव्हाणांना विश्वास

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. डोंबिवली मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा विजयी झाले. रवींद्र चव्हाण अनुभवी आहेत. भाजप अंतर्गत वाद मिटवण्यातही ते मध्यस्थाची भूमिका बजावत असतात. यंदाही त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा होती. परंतु, तसं काही घडलं नाही. भाजपने यंदा मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली.

भाजपचे आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या निवडणुकीत विजयी झाले. भाजपने त्यांना थेट महसूल खाते दिले. त्यांच्यासह आणखीही काही नव्या आमदारांना संधी दिली. त्यामुळे आधीच्या काही मंत्र्यांना डावलण्यात आलं. यात रवींद्र चव्हाण देखील होते. यानंतर रवींद्र चव्हाण यांना मोठं पद देणार असे भाजपातील नेते सांगत होते. त्यांना राज्य सरकारमधून काढून पक्ष संघटनेत घेण्याची तयारी करण्यात आली.

आता मिळालेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्षपदी त्यांचं नाव निश्चित झालं आहे. भाजपाचे प्रदेश अधिवेशन येत्या 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे होणार आहे. या अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार का याची उत्सुकता आहे. चव्हाण यांना आताच प्रदेशाध्यक्ष केले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळेल असेही सांगितले जात आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष राहू द्यावे असाही एक मतप्रवाह आहे.

विजयी गुलाल आपलाच, कोकणात महायुतीच जिंकणार, रविंद्र चव्हाणांना विश्वास

Exit mobile version