युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का? राज ठाकरेंचा संताप, सोशल मीडियातील पोस्ट काय..

मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता.

Raj Thackeray And Uddhav Thackray

Raj Thackeray And Uddhav Thackray

Raj Thackeray Social Media Post on Current Politics : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार (Maharashtra Local Body Electons) आहेत. यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या (Raj Thackeray) चर्चा सुरू आहेत. या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक (Uddhav Thackeray) आहेत. मात्र राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली आहे. विजयी मेळावा हा फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही असे राज ठाकरे यांनीच स्पष्ट केले होते. त्यानंतर आता त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांनी सध्याच्या घडामोडींवर भूमिका स्पष्ट केली आहे.

पक्षात दिवाळी अन् माझ्या घरात अंधार; राज ठाकरेंचे ज्येष्ठ सहकारी प्रकाश महाजनांना अश्रू अनावर

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी..

सस्नेह जय महाराष्ट्र,

14 आणि 15 जुलै 2025 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्यादरम्यान मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं.

त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का?

कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!

Video : थोडं वाचतं चला; भाषावादात ब्रिजभूषण सिंह यांचं राज ठाकरेंच्या शिक्षणावर बोट

नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल! पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा 1984 पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे. पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन !

Exit mobile version