Raj Thackeray’s Leadership Reshuffle in MNS : मुंबईत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आधी पक्ष संघटनेत मोठा बदल करण्यात आला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) पक्षात नव्याने पदरचना केली आहे. त्यानुसार मुंबई शहराला प्रथमच शहर अध्यक्ष देण्यात आला आहे. याशिवाय तीन उपशहर अध्यक्ष देण्यात आले आहेत. यानुसार मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबई शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. मुंबई महापालिकेत सध्या शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आहे. आता आगामी निवडणुकीत मुंबईची सत्ता अबाधित राखण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. तर दुसरीकडे भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे नाही. मनसेने या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
“हड, मी ते पाणी पिणार नाही” राज ठाकरेंचे कुंभमेळ्यातील स्नानाबाबत वादग्रस्त वक्तव्य
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी रवींद्र नाट्य मंदिरात पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उप शहर अध्यक्ष अशी नवीन पदे निर्माण करण्यात आली. यानुसार मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण मुंबई उपशहराध्यक्षपदी यशवंत किल्लेदार, मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माईनकर यांना मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांना देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांचा मनसेच्या केंद्रीय समितीत समावेश करण्यात आला आहे. ही केंद्रीय समिती पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणार आहे.
यानंतर पुढील वाटचाल कशी राहील याची माहिती 2 एप्रिलपर्यंत सर्वांना देण्यात येणार आहे. कामांची रचना आणि कामे कशी करायची याची माहिती देण्यात येईल. ज्याला जे काम दिलंय त्याने तेच काम करायचं. त्यामुळे भांडणे कमी होतील असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
“टोल टोल टनाटन”, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंना खोचक टोला अन् इशाराही..
ठाणे जिल्ह्यासाठीही पक्षात काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ठाण्यात विभाग अध्यक्षांसाठी प्रकाश भोईर आणि राजू पाटील यांच्यासह अन्य महत्वाचे नेते असतील. ठाणे महापालिकेतील उपविभाग अध्यक्षपदासाठी पुष्कर विचारे, गजानन काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील. अविनाश जाधव यांच्याकडे शाखाध्यक्षांचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.