Download App

Mumbai : अजितदादांचा आयुक्तांना फोन, अधिकाऱ्यांना खडसावलं; नेमकं काय घडलं?

Mumbai News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर भीमसागर एकवटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी (Mumbai News) दादर परिसरातील चैत्यभूमीवर येत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी एका गोष्टीवरुन अजित पवार (Ajit Pawar) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. अजित पवार यांनी चैत्यभूमी जवळील समुद्रातील व्ह्युईंग डेकला भेट दिली मात्र, येथील अस्वच्छता पाहून अजितदादा चांगलेच वैतागले. त्यांनी यावर संताप व्यक्त केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांना बोलावून घेतले.

अजित पवार यांचा फोन आल्यानंतर आयुक्त चहल सुद्धा काही वेळातच त्या ठिकाणी पोहोचले. अजित पवार यांनी व्ह्युईंग डेकवरील परिस्थिती चहल यांच्या निदर्शनास आणून दिली. येथील झाडांचं पूर्णपणे नुकसान झालंय आपण काय करतोय असा सवाल अजित पवार यांनी चहल यांना विचारला. ही झाडं आजच बदला अशा सूचना त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी शेजारीच उभ्या असलेल्या काही नागरिकांनी नारळी बागेतील अस्वच्छतेबाबत तक्रार केली. नारळी बागेची अवस्था अतिशय खराब झाली आहे. उद्यानातील अने उपकरणे खराब झाल्याचे या नागरिकांनी अजित पवार यांना सांगितले. यासाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला पण याठिकाणी स्वच्छता नाही. झाडांना पाणीही दिले जात नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर अजित पवार यांनी मनपा आयुक्त चहल यांना फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतले. निधी दिल्यानंतरही काम होत नाही, असे म्हणत अजितदादांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. आपण याकडे लक्ष देत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी आयुक्त चहल यांना विचारला. यानंतर चहल यांनी या प्रश्नांवर तातडीने मार्ग काढला जाईल असे सांगितले.

Tags

follow us