गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने काल (रविवारी) मुंबईतील इस्लामिक धर्मोपदेशक मौलाना मुफ्ती सलमान अझहरी (Maulana Mufti Salman Azhari) यांना अटक केली. गुजरातमधील (Gujrat) जुनागढ येथे प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल त्यांना अटक केली आहे. अटक करुन गुजरातला घेऊन जाण्यापूर्वी त्यांना घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी करत हजारो लोक पोलिस स्टेशनबाहेर जमले होते. आता या समर्थकांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत रात्री उशिरा मौलाना यांना मुंबईहून जुनागडला दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठविण्यात आले आहे. (Mumbai-based Islamic preacher Maulana Mufti Salman Azhari was arrested yesterday (Sunday) by Gujarat Police’s Anti-Terrorism Squad)
एक्स (ट्विटर प्रोफाईल)नुसार, मौलाना मुफ्ती सलमान अजहरी स्वतःला इस्लामिक रिसर्च स्कॉलर म्हणवतात. ते जामिया रियाझुल जन्ना, अल-अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक आहेत. मौलाना यांनी कैरोच्या अल अझहर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. मौलाना मुफ्ती अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय असतात. याशिवाय, ते इस्लामिक विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणही देत असतात. सोशल मीडियावर मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
पण ते अनेकदा आपल्या भडकाऊ भाषणांमुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी 31 जानेवारी रोजी गुजरातमधील जुनागढ येथील सेक्शन बी भागात एका कार्यक्रमात आक्षेपार्ह भाषण केले होते. या भाषणाचा एक व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि मौलानाविरुद्ध भादंवि कलम 153 सी, 502 (2), 188 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्या आधारे आयोजक आणि मौलाना या दोघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजकांनी या कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती. पण अझहरी लोकांना धर्म आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी संबोधित करतील असे सांगण्यात आले होते. पण त्यांनी भाषणादरम्यान प्रक्षोभक शब्दांचा वापर केला, ज्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यामुळे आयोजक आणि मौलानांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात पोलिसांनी मुंबईतून अटक करून घाटकोपर पोलीस ठाण्यात ठेवले होते.
याचनंतर मौलानांच्या हजारो समर्थकांनी त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला. यानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले. रविवारी पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जमावाविरुद्ध आयपीसीच्या कलम 332, 333, 336, 341, 353 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.