श्रीकांत शिंदेंची गुंड हेमंत दाभेकरशी भेट घडवणं भोवलं, अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी

  • Written By: Published:
श्रीकांत शिंदेंची गुंड हेमंत दाभेकरशी भेट घडवणं भोवलं, अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी

पुणे : भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली. यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली होती. या प्रकरणावरून एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो ट्वीट करत संजय राऊत यांनी (Sanjay Raut) टीकास्त्र डागलं होते.

दरम्यान, आता ही भेट घडवून आणणाऱ्या अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी करण्यात आली. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गँगस्टर हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावरून राऊतांनी ट्वीट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्याकडे शिंदेंच्या खासदाराचे परदेशातील ‘ते’ व्हिडिओ, त्यातून खरं चरित्र समोर येणार; राऊतांचा इशारा

संजय राऊत यांनी ट्विट करत लिहिले की, मा. गृहमंत्री देवेंद्रजी जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात, गुंडाचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीला जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशिर्वादाने मोकाट आहेत, असं राऊत म्हणाले.

अजित पवार लांडग्यांच्या भूमिकेत, बारामतीत ते सायकलवर फिरायचे…; संजय राऊतांचे टीकास्त्र 

हेमंत दाभेकर कोण आहे?

हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड आणि नुकतीच हत्या झालेल्या शरद मोहोळ याचा निकटवर्तीय मानला जातो. दाभेकर हा किशोर मारणे खून प्रकरणात शरद मोहोळसोबत सहआरोपीही होता. किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहोळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा सध्या जामीनावर आहे.

यातच हेमंत दाभेकर याने खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेताच विरोधक आक्रमक झालेत. या भेटीमुळे विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. या भेटीमुळे शिंदे गटाच्या आशिर्वादाने गुंड मोकाट फिरत असल्याची टीका होत आहे. त्यातूनच शिंदे आणि दाभेकर यांची भेट घडवून आणणाऱ्या अनिकेत जावळकर या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यालाच पक्षातून हाकलण्यात आलं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube