शिंदेंचा गेम, ठाकरे-फडणवीसांमध्ये चर्चा?, राऊतांनी आतल्या घडामोडी सांगितल्याने खळबळ

महापौरपदावरील राजकीय घडामोडींवर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली.

  • Written By: Published:
Untitled Design (286)

Sanjay Raut reveals internal Secreats : मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली. मुंबईने नेहमीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर पाहिला आहे. जर भाजपचा किंवा शिंदेच्या शिवसेनेचा महापौर बसला, तर तो दिवस मुंबईसाठी दुर्दैवी ठरेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

शिंदे गटाचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आले आहेत आणि भाजपनेही आपल्या नगरसेवकांना इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. याकडे लक्ष वेधत राऊत म्हणाले की, शिवसेनेचे नगरसेवक मात्र आपल्या घरीच आहेत. मातोश्रीवर नियमित बैठका होत असून कोणीही लपवाछपवी करत नाही. आमचे नगरसेवक स्वतःच्या गाडीत येतात आणि काम झाल्यावर परत जातात. मात्र भाजप आणि शिंदे गटाला आपल्या नगरसेवकांना बंदिस्त ठेवण्याची गरज का भासते, याचं उत्तर त्यांनीच द्यावं, असा घणाघात त्यांनी केला. शिंदे गटाच्या नगरसेवकांना ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार का, असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी टोला लगावत म्हटले आहे की, आम्ही जेवायला बाहेर जातो, मात्र आत लपवलेले पाहुणे बाहेर कधी येतात, ते आधी पाहूया.

राजकारणी मुस्लिमांपुढे कुत्र्यांसारख्या शेपट्या… कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

पुढे बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, मुंबईतील काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत आणि शिवसेनेच्या नगरसेवकांबाबत तर प्रश्नच उद्भवत नाही.
आता खरी फोडाफोड भाजप आणि शिंदे गटातच होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच वेगळाच तमाशा पाहायला मिळेल. भाजपचा महापौर होऊ नये म्हणून सत्ताधारी देवपाण्यात बसले आहेत. आधी त्यांचा निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू, असे ते म्हणाले. भाजपचा महापौर मुंबईत बसण्याची तुलना करत राऊत यांनी पुन्हा एकदा तीव्र वक्तव्य केलं. ‘मोरारजी देसाई यांच्या काळात मुंबईत 106 लोक मारले गेले, तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकसारखाच असेल,’ असे विधान त्यांनी केले.

राजकारण केवळ आकड्यांवर चालत नाही, असे सांगत राऊत म्हणाले की, शिंदे गटाकडे आवश्यक 30 नगरसेवक नसतानाही ते महापौर पदाची स्वप्न पाहत आहेत. कोणाला महापौर बनवायचं ते बनवतील, पण आम्ही अजून मैदानात आहोत. टायगर अभी जिंदा है. शिवसेना आणि मित्रपक्षांकडे सत्ताधाऱ्यांना आव्हान देईल इतकी ताकद आहे. सध्या आम्ही फक्त हा खेळ पाहतोय, असे ते म्हणाले. दरम्यान, महापौर पदासाठी शिंदे गट उत्सुक असल्याने ते भाजपावर दबाव टाकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आकड्यांच्या खेळात स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असतानाच, भाजपाने वेगळीच रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे.

महापौर पदासाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग; शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

सूत्रांच्या माहितीनुसार, महापौर निवडीच्या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 65 नगरसेवक अनुपस्थित राहावेत, अशी योजना भाजपाकडून आखली जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवर चर्चा केल्याचेही सांगितले जात आहे. जर असे झाले, तर 228 सदस्यांच्या महापालिकेत बहुमताचा आकडा 114 राहणार नाही आणि अशा परिस्थितीत शिंदे गटाची गरज कमी होऊ शकते. त्यामुळे महापौर निवडीचा पेच अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

follow us