Mumbai Boat Accident : मुंबईतील एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बोट बुडाली. या बोटीला नौदलाच्या बोटीने (Elephanta Boat Accident) धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. दरम्यान, या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. या अपघातातील दोन जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहितीही समोर आली आहे. इंजिन चाचणी करत असताना नौदलाच्या यानाचे नियंत्रण सुटले आणि कारंजा मुंबई येथे नीलकमल या प्रवासी फेरीला धडकली अशी माहिती नौदलाने दिली आहे.
मुंबई बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; CM फडणवीसांची घोषणा
मुंबईजवळील बुचर आयलंडजवळ दुपारी 3.55 वाजता नौदलाच्या स्पीड बोटने नीलकमल नावाच्या बोटीला धडक दिली. ही मोठी दुर्घटना आहे. या अपघातात 101 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. नौदलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत 13 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. त्यात 3 नौदल कर्मचारी आहेत. तर 10 नागरिकांना मृत घोषित करण्यात आलंय, अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. बेपत्ता लोकांसाठी शोध कार्य सुरू असल्याचे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सायं. 7.30 पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी 101 लोकांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या… https://t.co/JMSVccvFg5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2024
या बोटीची क्षमत 80 प्रवाशांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. एकूण 110 प्रवासी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलतांना फडणवीसांनी या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु, हा अपघात कशामुळे घडला याची माहिती समोर आली नव्हती. नंतर काही वेळाने नौदलानेच अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला याची माहिती दिली.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
दरम्यान, मृत 13 जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) अधिकृत माहिती दिली की बोटीवर सुमारे 110 जण होते. 110 प्रवाशांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे सिद्ध झाले.